गरिबांचा आरोग्यदूत : मंगेश चिवटे

आपल्या प्रिय व्यक्तींच्या, गुरूच्या नावानं ‘मोफत (नो कॅश) वैद्यकीय सेवा केंद्र’ सुरू केलं, तर त्याचा गरीब रुग्णांना उपयोग होईल. ही केंद्रं पुतळ्यांच्या स्मारकांपेक्षा चिरंतन स्मारकं होतील, असे विचार असणारे आणि रुग्णसेवेला ईश्वरी कार्य मानणाऱे मंगेश चिवटे हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता केंद्राचे प्रमुख आहेत. गरिबांनी उपचार, शस्त्रक्रियेसाठी पैसे नसतील तर उपचारांविना तडफडून मरायचं का? असं काही वर्षांपूर्वी वाटायचं. व्यवस्थेचा राग यायचा, पण आता तसं होणार नाही. कारण वैद्यकीय व्यवस्थेनं एक पाऊल सकारात्मकतेच्या दिशेनं टाकलंय. त्याला अनेक गरीब ज्येष्ठांचे हात उत्स्फूर्त आशीर्वाद देताहेत.

मळलेली फाटकी कापडं, हातात तशीच पिशवी, धड उभंही राहता न येणाऱ्या त्या रुग्णाला घेऊन त्याची बायको एका रुग्णालयात आली होती. त्यांचा अवतार पाहून अठराविश्व दारिद्रय म्हणजे काय असतं, ते समजत होतं. इथल्या उपचारांसाठी हे दांपत्य पैसे कुठून आणणार? रोजच्या उदरनिर्वाहाची भ्रांत; तिथं मोठ्या रुग्णालयात उपचार घेणं म्हणजे… दुर्गम भागातून हे दांपत्य मोठ्या शहरात कर्करोगावर उपचार घेण्यासाठी आलेलं होतं. भारतात ही विषमता नेहमी दिसते- श्रीमंत माणसं लाखो रुपये खर्च करून हव्या त्या ठिकाणी हवे तसे उपचार घेऊ शकतात; शस्त्रक्रिया करू शकतात. त्यांच्यासाठी भारत ‘मेडिकल हब’ आहे. परदेशातले काहीजण त्यांच्या मानानं स्वस्तात उपचार मिळतात म्हणून ‘मेडिकल टुरिझम’साठी इथं येतात आणि एक वर्ग असा आहे की, तातडीचे उपचार घेण्याइतकेही त्याच्याजवळ पैसे नाहीत.

जिवंत राहण्यासाठी धडपड करताना फाटका खिसा असमर्थ असतो. ही पराकोटीची विषमता त्या दांपत्याच्या दीनवाण्या चेहऱ्यावरून लक्षात येत होती. रुग्णालयाच्या स्वागत कक्षात बसलेल्या वैद्यकीय समाजसेवकांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांना दिलासा देऊन मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाबद्दल त्यांना सांगितलं.

हे कळल्यावर त्यांना आनंद झाला. अशी दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी पैसे नसलेली कितीतरी माणसं या मदत निधीचा लाभ घेऊन मोफत उपचार घेताना दिसताहेत. मंगेश चिवटे आणि सरकारला भरभरून दुवा देताना दिसताहेत. कारण चिवटे यांच्या प्रयत्नांमुळं राज्यात अतिशय पारदर्शी पद्धतीनं सुरू असलेल्या या सेवेचा लाभ महाराष्ट्रातले हजारो रुग्ण घेताहेत.

… तर नाही. ते सामाजिक भान असलेले संवेदनशील पत्रकार आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख आहेत. आपल्याला प्रश्न पडतोच की, वैद्यकीय क्षेत्राची पार्श्वभूमी

नसतानाही हा माणूस त्या क्षेत्राशी संबंधित एवढ्या मोठ्या पदावर कसा काय असेल? आपण त्यांचा प्रवास जाणून घेतो आणि लक्षात येतं, या पदावर मंगेशभाऊंच्या जागी दुसरं कुणी असूच शकत नाही.

मंगेश चिवटे यांचं गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा. आई कमला भवानीच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं. ही देवी महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या तुळजा भवानीचं प्रतिरूप म्हणून ओळखली जाते. या देवीवर मंगेशभाऊंची खूप श्रद्धा आहे. त्यांचं शालेय शिक्षण करमाळ्यात झालं. महात्मा गांधी विद्यालयात ते हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे. त्यानंतर ११ वी आणि १२ वीचं शिक्षण त्यांनी पुण्यातल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात केल्यावर त्यानंतर म्हणजे २००५ साली ते पत्रकारितेचं शिक्षण घ्यायला मुंबईत गेले. शिक्षण सुरू असतानाच पत्रकार म्हणून काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी इंटर्नशिप करावी लागते. मंगेशजी इंटर्नशिप करायला थेट विधानभवनात गेले. ते पावसाळ्याचे दिवस होते. ते आमदार बच्चू कडू यांना भेटायला गेले होते. त्यांनी विधान भवनाच्या बाहेर उभ्या असलेल्या बच्चूभाऊंना हाक मारली आणि त्यांच्याकडे ‘मला विधान सभा बघायचीय’, ही इच्छा बोलून दाखवली. त्यावेळी बच्चूभाऊंनी त्यांना अनेक प्रश्नं विचारले.


नाव, गाव, शिक्षण… सगळ्याची माहिती घेतली.त्यानंतर ते मंगेशजींना आत घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच प्रेक्षक गॅलरीतून विधानसभेचं कामकाज पाहिलं. बच्चूभाऊंनी त्यांना आपला संपर्क क्रमांक दिला. त्यानंतर आठ दिवसांनी मंगेशजी मनोरा आमदार निवासामध्ये बच्चूभाऊंच्या खोलीवर गेले. खोलीतलं दृष्य त्यांना आचंबित करणारं होतं. ती खोली गावाकडच्या माणसांनी भरलेली. त्यांच्या बेडवरही एक रुग्ण विश्रांती घेत होता. तिथं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेले दुर्धर आजारांनी ग्रस्त असे रुग्ण असायचे. हे रुग्ण मुंबईतल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये विविध चाचण्या करायला, डॉक्टरांकडून तपासून घ्यायला, उपचारांसाठी आलेले असायचे. हे दृष्य त्यांच्या भविष्यातील मोठ्या कामाची नांदी ठरली.

‘या लोकांसाठी यथाशक्ती जी मदत करता येईल ती मदत करतोय. तशी ती करायला हवी. मुंबईत त्यांचं तरी कोण असतं? ते गावाकडच्या डॉक्टरांनी मुंबईला जाऊन दाखवा असं सांगितल्यावर भांबावतात, अशावेळी आपणच त्यांची मदत करायला हवी’, हे सांगणाऱ्या बच्चू कडूंचं हे कार्य आणि समाजाप्रती असलेली संवेदनशीलता पाहून मंगेशजी भारावून गेले. आपणही या कामात सहभागी व्हायला हवं, असं त्यांना वाटलं. त्यावेळी ते फक्त एकोणीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांच्या गावातल्या एका रुग्णासंदर्भात बच्चू कडू यांच्याशी बोलल्यावर त्यांनी चांगल्या रुग्णालयाशी संपर्क साधून त्याच्यासाठी डायलिसिसची व्यवस्था केली होती. त्यानंतर त्यांच्या गावाच्या पंचक्रोशीत ही गोष्ट समजल्यावर कुणाला वैद्यकीय मदत हवी असेल, तर ते मंगेशभाऊंना सांगू लागले. गरजू रुग्णांच्या नातेवाइकांचे फोन यायला लागले.

स्टार माझानं एका शिकाऊ उमेदवाराला चांगली संधी दिली होती. त्यावेळी मंगेशभाऊंचा मंत्री, आमदार, मुख्यमंत्री यांच्याशी नेहमी संपर्क यायचा. या ओळखीचा उपयोग त्यांनी गावाकडून मुंबईत उपचारांसाठी येणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी करायचं ठरवलं. त्यांना मदत मिळत गेली, तसा गावाकडच्या रुग्णांबाबत रुग्णालय प्रशासनाशी बोलताना आत्मविश्वास येत गेला. जिथं मदत करण्याची आवश्यकता असायची तिथं राजकीय व्यक्तींशी किंवा थेट संपर्क ते साधत असत. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनीही खूप मदत केली होती. विधी व न्याय खातं मुख्यमंत्र्यांकडं असतं. चॅरिटेबल हॉस्पिटल्समध्ये त्या त्या मुख्यमंत्री कार्यालयाची मदत घेऊन गरजू रुग्णांना १० टक्क्यांतून किंवा मोफत खाटांची सवलत देता येतेय का किंवा ५० टक्के आर्थिक मदत देता येतेय का, यावर काम सुरू होतं. त्यावेळी त्यांच्या डोक्यात वेगळ्याच गोष्टी सुरू होत्या.

अकरावी, बारावीत शिकत असताना त्यांना २००३ ते ०५ साली पुण्यात प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची व्याख्यानं ऐकण्याचा योग आला. त्यावेळी त्यांची भाषणं तरुणाईला वेगळी स्फूर्ती देऊन जायची. त्यांच्याकडून त्याकाळी समाजासाठी काही करण्याची अनेकांनी प्रेरणा घेतली होती आणि भविष्यात आपण समाजोपयोगी काम करू, अशी शपथही मंगेशजी आणि त्यांच्या मित्रांनी घेतली होती.

युपीएससीची परीक्षा देऊन आपण प्रशासकीय अधिकारी व्हावं आणि लोकांची प्रामाणिकपणे सेवा करावी, ही मंगेशजींची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी सन २०१० ते २०१३ या काळात पत्रकारितेमधून गॅप घेतला होता. दिल्लीला युपीएससीसाठी गेल्यावर करोल बाग परिसरात राहायला मिळालं. त्यावेळी त्यांना मित्रांनी आठवण करून दिली की,

त्यावेळेला मंगेशजींनी स्टार माझाच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. युपीएससीच्या तयारीच्या दरम्यान दिल्लीत असतानाही गावाकडून त्यांना वैद्यकीय मदत मागणारे फोन यायचे. ‘आपण अशी मदत करण्यासाठी काहीतरी भव्यदिव्य रचनात्मक काम उभं करायला हवं, जेणे करून सामान्य माणसाच्या जीवनात चांगला बदल होऊ शकतो’,

हे मनात घोळत होतंच. युपीएससीची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, पण ‘आपण काय करू शकतो’, याचं मंथन त्यांच्या डोक्यात सुरू राहिलं. यातून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची संकल्पना काही प्रमाणात त्यांच्यापुढं स्पष्ट झाली. हजारो रुग्ण त्यांच्या अत्यंत अडचणीच्या काळात मदतीसाठी सगळीकडे धावाधाव करतात, त्यांना एक खात्रीचा आधार देण्यासाठी सरकारी पातळी वरूनच एक चांगली व्यवस्था उभी राहिली पाहिजे, यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली. त्यादरम्यान त्यांनी पुन्हा सकाळ वृत्तपत्र माध्यम समूहाच्या साम वृत्तवाहिनीवर पत्रकारिता सुरू केली. मुलाखतींच्या निमित्तानं राजकीय नेत्यांच्या संपर्कात राहण्याची त्यांना संधी मिळाली. यातील एक नाव होतं, देवेंद्र फडणवीस. फडणवीस त्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते.


त्यांना मंगेशजींनी आपली संकल्पना सांगितली. २०१४ साली विधानसभा निवडणुका झाल्या आणि भाजपा सत्तेत येणार याची खात्री झाली. २०१४ साली त्यावेळचे राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पत्रकारितेत पुन्हा कार्यरत झाल्यावर देवेंद्रजींशी त्यांची चांगली ओळख झाली होती. मुलाखती घेण्याबरोबर इतर बाबींवरही त्यांच्याशी बोलणं व्हायचं. भेटणं व्हायचं. गावाकडच्या तसंच गरीब रुग्णांसाठी काही प्रमाणात वैद्यकीय उपचार सुलभ, मोफत होण्यासाठी व्यवस्था उभी करायला हवी, या विचारांवर देवेंद्रजींशी त्यांची चर्चा झाली होती. ते सांगतात,

‘‘तो दिवस अजूनही आठवतोय. वानखेडे स्टेडियमवर ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी देवेंद्रजींचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार होता. त्या दिवशी सकाळी ते मोदीजींनी देशभर आयोजित केलेल्या ‘रन फॉर युनिटी‘अंतर्गत धावून आले होते. ‘सकाळी सव्वाआठ वाजता मला भेटले. तेव्हा मी त्यांना आठवण करून दिली, ‘आता तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात आणि आपल्याला रुग्णसेवेसाठी काम करायचंय.’ त्याची संकल्पना अशी होती की, दुर्धर आजार झालेल्या रुग्णांना कधी शस्त्रक्रियेसाठी, उपचारांसाठी प्रचंड खर्च येतो. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री निधीतून दहा-वीस हजार रक्कम दिली जाते, ती खूपच कमी असते. अशा गरजू रुग्णांना आपण एक लाख-दोन लाख रुपयांपर्यंत टप्प्याटप्प्यांनी मदत देऊ शकलो तर…

पैशाविना रुग्णांचे थांबलेले उपचार त्वरित सुरू करता येतील. थांबलेल्या शस्त्रक्रिया लगेच करता येतील. बऱ्याच गरीब रुग्णांना कधी घरदार-सोनंनाणं विकावं लागतं. त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. ते कुटुंब आर्थिक संकटात सापडतं. अशा घरात कुणी शाळेत जाणारी मुलं असतील, तर त्यांच्यावरही परिणाम होतो.

उपचारांबरोबरच मनावर आर्थिक परिस्थिती तसंच असहायतेमुळं येणारा ताण खूप असतो. हा ताण हलका करण्याचा प्रयत्न करता येईल.’

त्यांना आठवण करून दिली तेव्हा ते म्हणाले, ‘‘या सुविधा आपल्याला लवकर सुरू करायच्या आहेत.’’ त्यानंतर सतत पाठपुरावा केल्यानंतर देवेंद्रजींनी या उपक्रमाच्या फाईलवर सही केली. मुख्यमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्याकडं अंमलबजावणीसाठी हा विषय गेला. काही दिवसांतच अधिकृतरीत्या म्हणजे १७ मार्च २०१५ रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू झाला. देवेंद्र फडणवीसांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात ५० हजार ७०० रुग्णांना या कक्षाद्वारे मदत मिळाली.

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ या राज्य सरकारच्या निधीतून नैसर्गिक आपत्तीसाठी मदत केली जाते. याच निधीतून गरजू रुग्णांनाही मदत केली जाते. राज्यातील साखर कारखाने एका साखरेच्या पोत्यामागे पाच रुपये या निधीला देतात. अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्था या निधीत भर घालतात. यातून एक मोठी रक्कम जमा होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या कक्षाने साऱ्या राज्यात आपला नावलौकिक कमावला. राज्यातून हजारो रुग्णांना मदतही मिळाली, परंतु त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हा कक्ष मरणासन्न अवस्थेत गेला. कक्षात अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या नाहीत. सत्ताबदलानंतर कोविड १९ ने जगभरात धुमाकूळ घातला. महाराष्ट्रात ऐन कोरोनाच्या काळात खरं तर या कक्षामुळं निदान लवकर झालं असतं, अनेकांवर तातडीचे उपचार झाले असते.

त्याचा फायदा लाखो लोकांना झाला असता. ज्यावेळी खरी गरज होती, त्या काळातच हा कक्ष शांत झाला होता. मंगेशजींना रुग्णसेवेचा दांडगा अनुभव असल्यानं त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य महाशिबिरं आयोजित करून लाखो गरजू लोकांना मोफत औषधोपचार करण्यात आले होते. तसेच नेत्रचिकित्सा शिबिरं भरवून सर्वधर्मीय गरजू लोकांना मोफत चष्मा वाटप केलं होतं. कोरोना काळात हे मदत कक्षाचं कार्यालय लोकांच्या मदतीसाठी २४ तास सुरू ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका, रेमडेसीवीर अन् रुग्णालयात बेड मिळण्यास मदत झाल्याने हजारो रुग्णांचे प्राण वाचले होते. ठाणे जिल्ह्यात डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या साथीनं रुग्णसेवेचं काम मोठ्या प्रमाणात सुरू केलं होतं. मंगेशजी ठाण्यात काम करत होते, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी अशा एका रुग्णालयाची कल्पना केली होती, जिथं बिलिंग काऊंटरच नसेल. गरीब रुग्णांना ताबडतोब निदान होऊन उपचार मिळतील. या संकल्पनेला मूर्त रूप आलं ते २०२१ साली. ठाण्यात ‘धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग निदान काऊंटर’ सुरू केलं गेलं. इथं हृदयरोगाच्या रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करणारं रुग्णालय सुरू झालं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या नावानंही एक मोफत उपचार करणारं रुग्णालय सुरू केलं गेलं.

त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पुन्हा पूर्ण जोमाने सुरू झाला. या कक्षाची सगळी जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मंगेश चिवटे यांच्याकडे सोपवली गेली. मंगेशसरांच्या आवडीचंच हे काम असल्यानं त्यांनीही मोठ्या उत्साहानं यावर काम सुरू केलं.

या टॅगलाईनखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम चालतं.


इथं कोणीही दलाल नाही. गरजू व्यक्तींनी थेट ऑनलाईन अर्ज करायचा आणि मदत मिळवायची असं धोरण आहे. तुमची कागदपत्रं जर योग्य असतील ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर फोन करायचा. काही दिवसांतच या कक्षाअंतर्गत मदत मिळू शकते. गेल्या दोन वर्षांत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २७५ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिलंय. त्यामुळं ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचलेत. ज्यांना बोलता येत नव्हतं, अशा हजारेक मुलांना या कक्षाच्या मदतीनं केलेल्या शस्त्रक्रियेमुळं ती आता बोलू लागली आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. कित्येकांना जयपूर फूट बसवला आहे.

आपल्या पत्रकरिता क्षेत्रातील कामाचा आणि ओळखींचा अत्यंत विधायक वापर करणारे मंगेश चिवटे हे रुग्णसेवेसाठी ओळखले जातात. समाजातील श्रीमंत दानशूर व्यक्तींना त्यांचं आवाहन आहे की, आपला वाढदिवस असेल किंवा आपल्या प्रिय व्यक्तीची स्मृती असेल यासाठी रुग्णांना मदत करण्याइतका दुसरा चांगला मार्ग नाही. पुतळे उभे करून एखाद्याची स्मृती जिवंत ठेवण्यापेक्षा मोफत उपचारांचं एखादं काऊंटर सुरू करून त्याद्वारे जर काम केलं, तर ते समाजाच्या खऱ्या अर्थानं उपयोगी पडेल. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातलं पहिलं ‘नो कॅश काऊंटर डायलिसिस सेंटर’ करमाळ्यात मंगेशजींच्या गावी त्यांच्या आजोबांच्या नावानं उभं राहिलंय. त्याला डॉ. श्रीकांत शिंदे यांची साथ आहे. करमाळ्याच्या परिसरातील कोणत्याही तालुक्यातला डायलिसिसचा रुग्ण आल्यास त्यानं फक्त अर्ज भरायचा. जोपर्यंत डायलिसिसची गरज असते किंवा किडनी प्रत्यारोपण होत नाही तोपर्यंत ही सेवा मोफत मिळते. सत्ताधारी आणि समाजात नागरिकांना उपयोग होईल अशी व्यवस्था उभी करू पाहणारे लोक यांच्या एकत्रित प्रयत्नांनी एखादं काम चांगल्या रीतीने उभं राहू शकतं, याचं याहून वेगळं उदाहरण काय असू शकतं?

आज किती रुग्ण चिवटे यांना दुवा देत असतील, त्याची गणतीच नाही. वैचारिक पाया आध्यात्मिक असल्यामुळं मंगेशजींना रुग्णसेवा हीच खरी आई कमला भवानीची सेवा वाटते.’आरोग्यम धनसंपदा’ म्हणजेच आपली खरी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे; पण आरोग्यसेवांसाठी रुग्णांचा खर्च इतका होतो की बिलांचे आकडे सहजच लाखांच्या पुढे जातात, त्यावेळी एखाद्या गरीब घरातील सगळी धनसंपदा त्यासाठीच नष्ट होऊन जाते. ही परिस्थिती आपण सगळेच पाहत आहोत. एका संवेदनशील पत्रकाराने यातून मार्ग काढण्यासाठी केलेले प्रयत्न, त्याला लाभलेली राज्यकर्त्यांचीही साथ आणि महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीला येणारा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष या तिन्ही गोष्टींच्या एकत्रित प्रयत्नांनी, ‘देणाऱ्यांचे हात हजारो, दुबळी माझी झोळी’ हा अनुभव सामान्य माणसाला येतोय.

COMMENTS

error: Content is protected !!