छोड ना मन की आस! : शंकर गायकवाड

मेंढ्या विकून वडिलांनी मोठ्या विश्वासानं हातावर पैसे ठेवले आणि शंकर गायकवाड यांना व्यवसाय करण्यास पाठबळ दिलं. भाड्याच्या घराच्या छोट्या खोलीत त्यांनी व्यवसाय सुरू केला. या व्यवसायानं इतकी झेप घेतली की, ६५०० रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेल्या त्यांच्या व्यवसायाचा टर्नओव्हर ३०० कोटींपर्यंत पोहोचलाय. वडिलांनी खरंच शंकरभाऊंच्या वयाच्या अठरा-एकोणिसाव्या वर्षीच त्यांच्यामधला धडाडीचा उद्योजक पाहिला होता.

दहावीपर्यंत गावाची वेसही न ओलांडलेला अल्पभूधारक शेतकऱ्याचा आयटीआय शिकलेला मुलगा एक ध्यास घेतो आणि त्यासाठी थेट दिल्ली गाठतो. त्यातून त्याला व्यवसायाचे आणि आयुष्याचे मार्ग उलगडत जातात. ‘अंकिता ऑटो कोटींग्ज पॉलिमर’सारखा मोठा व्यवसाय उभा राहतो. अनेक संकटं येतात, उलथापालथ होते;

पण त्यावर मात करून एसजीए ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अंतर्गत नऊ उपकंपन्या उभ्या करून त्यांचं देश-परदेशात नाव मोठं करतो. ही वाटचाल आहे, शंकर कुंडलिक गायकवाड यांची. ते म्हणतात,

शंकर कुंडलिक गायकवाड हे दौंड तालुक्यातील डाळिंब या छोट्याशा खेडेगावात गायकवाड वस्तीत जन्माला आले. त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी असल्यानं आई-वडील दुसऱ्याची मोलमजुरी करून आणि मेंढ्या पाळून त्यांचं आणि त्यांच्या मोठ्या भावाचं संगोपन करत असत.

ते दोघंही अशिक्षित असल्यामुळं त्यांना मुलांनी काय आणि कसं शिक्षण घ्यावं, जेणेकरुन भविष्यात त्यांना त्याचा फायदा होईल, याची माहिती असण्याचं कारणच नव्हतं. शंकरभाऊंचे मोठे भाऊ वाल्मीक यांनी त्यांना दहावीनंतर प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर या कोर्ससाठी प्रवेश घेण्यास सांगितलं. त्यांनी पुण्यातील औंधमधल्या आयटीआयमध्ये शंकरभाऊंना प्रवेश मिळवून दिला. त्यावेळी ते सोळा वर्षांचे होते. डाळिंब गावातून

औंधला जायचं म्हणजे एक दिव्य होतं. दहावीपर्यंत गावाबाहेरील जग त्यांनी पाहिलेलंच नव्हतं. उरुळी कांचन सोडून काहीही माहिती नव्हतं. त्यांच्या भावानं त्यांना दोन वेळा डाळिंब ते औंध, हा प्रवास कसा करायचा, ते सांगितलं होतं. ते डाळिंब ते उरुळी कांचन रेल्वे स्टेशन सायकलने, रेल्वेने उरुळी कांचन ते पुणे स्टेशन, पुणे स्टेशन ते औंधमधील आयटीआय पुन्हा सायकलवरून जात असत. त्यांचा रोजचा सायकल प्रवास 32 किलोमीटर इतका व्हायचा. आयटीआयमध्ये जाण्यायेण्यास लागणारा वेळ आणि त्यासाठी करावे लागणारे श्रम याकडं दुर्लक्ष करून ते चिकाटीनं शिकत राहिले.

सन १९९६ मध्ये म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी ते आयटीआय उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांना त्याचवर्षी सणसवाडीमध्ये आयडीडब्लू इंडिया प्रा. लि. या कंपनीत नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांचा पगार होता, ८९० रुपये. नोकरी हा त्यांनी उदरनिर्वाह आणि अनुभवासाठी तात्पुरता पत्करलेला पर्याय होता. खरं तर त्यांचं लक्ष्य होतं ते प्लास्टिकच्या क्षेत्रात व्यवसाय उभा करण्याचं.


प्लास्टिकच्या जगतात काय चाललं आहे, हे त्यांना नोकरीच्या ठिकाणी असताना समजायचं. त्यातच माहिती मिळाली की, प्लास्टिक उद्योगांचं जागतिक पातळीवरील प्रदर्शन दिल्लीमधल्या प्रगती मैदानात भरणार आहे. हे प्रदर्शन तीन वर्षातून एकदा भरतं. जागतिक पातळीवरील प्लास्टिक तंत्रज्ञान आणि मशीनरी तिथं असतात. नवीन तंत्रज्ञान, उत्पादनं पाहायला मिळतात. वर्ष होतं, १९९७. त्यावेळी शंकरभाऊ अवघे १८ वर्षांचे होते. काहीही माहिती नसताना दिल्लीला जायचं ठरवलं. ज्या मुलानं वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत गावची वेस ओलांडली नव्हती, तो थेट दिल्लीला जाणार होता. हे त्यांचं आयुष्यातलं पहिलं धाडस. दिल्लीला जाण्याआधी त्यांनी तिथल्या महाराष्ट्र भवनशी संपर्क साधला.

त्यावेळी मोबाईल फोनसारखी संपर्काची सहज सोपी साधनं नव्हती. महाराष्ट्र भवनमधील लोकांनी त्यांना सगळी माहिती दिली आणि ‘काही लागलं तर पोलिसांना विचारायचं’, असं सांगितलं. दिल्लीमध्ये रात्री पोहोचल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा ते पोलीस वाईचे होते. परमुलखात मराठी माणूस भेटल्यावर आनंद होतो, तसा त्यांना झाला. त्यांनी शंकरभाऊंना महाराष्ट्र भवनात नेऊन सोडलं. त्या प्रदर्शनात त्यांच्या ओळखी झाल्या. अनेक उद्योजकांशी संवाद साधता आला. त्यांनी तिथं या उद्योगासंदर्भात बरीच माहिती गोळा केली. चार दिवस प्रदर्शन होतं; पण ते सहा दिवस थांबले होते, ते केवळ तिथं आलेल्या लोकांचं मार्गदर्शन घेण्यासाठी, त्यांच्याशी सविस्तर बोलण्यासाठीच!

दिल्लीचा हा प्रवास म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारची स्टडी टुरच होती. तिथं प्लास्टिकमधील नवनवीन तंत्रज्ञान पाहिल्यावर या क्षेत्रातच छोटासा व्यवसाय करायचा, असं त्यांनी ठरवलं; परंतु दोघाही भावांनी सावधगिरीनं पावलं उचलली. एकदम नोकरी न सोडता पानटपरीचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला. त्याचबरोबर सायकल

दुरुस्त करणे, पंक्चर काढणे हाही व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून मिळणारे पैसे ते शिलकीत टाकत गेले. पैसे साठले तेव्हा साडेसहा हजार रुपयांमध्ये एक छोटीशी हॅन्ड इंजेक्शन मोल्डिंग मशीन खरेदी केली. २१ मे २००० या तारखेला राहत्या खोलीतच व्यवसाय सुरू झाला. मोठ्या कंपन्यांची कामं त्यांना दुसऱ्या कंपनीकडून मिळायला सुरुवात झाली होती. म्हणजे थर्ड पार्टी म्हणून मिळालेली कामं. नोकरी करून संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांनी त्या मशीनवर सहा ते आठ तास काम करायला सुरुवात केली. पहिल्याच महिन्यात त्यांना व्यवसायातून २२४४ रुपये नफा झाला. सलग सहा महिने काम केल्यानंतर व्यवसायाची गणितं कळू लागली, असं ते सांगतात.

वडील त्यांचे कष्ट आणि व्यवसायाप्रति असलेली निष्ठा पाहत होतेच. ‘आपला मुलगा चांगला व्यवसाय करू शकतो’, हे जेव्हा वडिलांच्या लक्षात आलं तेव्हा ३० नोव्हेंबर २००० या दिवशी मेंढ्या विकून व्यवसायासाठी ७० हजार रुपये भांडवल म्हणून उभे करून दिले.

तसंच मालाची ने-आण करण्यासाठी ४१ हजार रुपयांची नवी कोरी हिरो होंडा सीडी -१०० घेऊन दिली. त्यांनी शंकरभाऊंना त्यावेळी सांगितलं की, ‘तुला व्यवसायाची आवड आहे. माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे, परंतु यापेक्षा आणखी काही मदत करू शकत नाही.’ खरं तर वडिलांनी व्यवसायासाठी इतकं पाठबळ देणं, हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. एक मोठी जबाबदारी देण्यासारखंच होतं.

त्यानंतर शंकरभाऊंनी २००१ साली आणखी एक हॅन्ड मोल्डिंग मशीन विकत घेतलं. त्यांना त्याचा फायदाच झाला कारण एका कंपनीचं कामही लगेच मिळालं.

शंकरभाऊंच्या कामावर खुश होऊन त्या कंपनीचे मॅनेजर बुवा कुंभार यांनी बजाज पंख्यामधील नायलॉनचे कनेक्टर तयार करण्याचं काम दिलं. अजून व्यवसायात जम बसायचा होता. त्यामुळं भाग भांडवल कमी असल्यानं पिंपरीहून आठवड्यातून दोन वेळा मशीनसाठी लागणारा कच्चा माल घेऊन त्यांना यावं लागायचं. थोडा व्याप वाढत चालल्यानं मनुष्यबळाची गरज होतीच. त्यासाठी पाहुण्यांच्याच संजय पेटकर आणि नाना पेटकर या दोन मुलांना कामावर ठेवलं. २००२ साली पुन्हा एक ऑटोमॅटिक इंजेक्शन मोल्डिंग मशीन घेतल्यानंतर आता त्यांच्या घरात जागेची अडचण होत होती. थोडी मोठी जागा घ्यावी लागणार होती. शिरूर तालुक्यामधील कोरेगाव भीमा येथे ५०० स्क्वेअर फुटांच्या एका गाळ्यात शंकरभाऊंनी आपलं काम चालू केलं. ‘व्यवसाय करताना इतक्या अडचणी आल्या की, बरेचदा त्यांना आपला व्यवसाय बंद करावा वाटायचा. हा विचार मनात येताच वडिलांची आणि त्यांनी व्यवसायासाठी विकलेल्या मेंढ्यांची आठवण यायची’, असं ते सांगतात.

त्यामुळं कितीही नैराश्याचं मळभ दाटलं, तरी शंकरभाऊंनी जिद्द सोडली नाही. नोकरी सांभाळत व्यवसायही चालू ठेवला. व्यवसायासाठी आणखी भांडवल उभं करायला सलग तीन वर्षं चाकणला रात्रपाळीत नोकरी केली. मात्र नंतर व्यवसायासाठी पूर्ण वेळ द्यायचा असं ठरवून शेवटी २१ जुलै २००५ मध्ये त्यांनी नोकरी सोडली.


व्यवसायवृद्धी करण्यासाठी त्यांनी १ एप्रिल २००६ रोजी भागीदारीत ‘मेसर्स अंकिता प्लास्ट इंडस्ट्रीज्’ या नावानं स्वतःची जागा खरेदी करून आणखी दोन मशीन घेतल्या. पूर्ण वेळ व्यवसायासाठी देता येऊ लागला. खूप कष्ट करायचे आणि व्यवसाय वाढवायचा, या इच्छाशक्तीनेच ते कामाला लागले. ग्राहकांना मालाचा दर्जा आणि सेवा आवडल्यानं नवीन ऑर्डर मिळत गेल्या. कामाचा व्याप वाढला तसं पुन्हा भांडवल कमी पडायला लागलं. भांडवलासाठी संपदा सहकारी बँक लिमिटेड या बॅंकेनं मदतीचा हात दिला. नवीन मशीन घेण्यासाठी शंकरभाऊंना त्यांच्या वडिलांची शेतजमीन तारण ठेवून कर्ज दिलं. बँकेचे अध्यक्ष विवेक मटकरी यांनी व्यवसायाचं रेकॉर्ड पाहून ३७ लाख ५० हजार रुपये इतकं कर्ज दिलं. ते सांगतात,

शंकरभाऊंकडच्या ऑर्डर कमी झाल्या होत्या. त्यामुळं कामगारांचे पगार, बँकेचे हप्ते भरणे, वीज बिल भरणे या गोष्टी अवघड होऊ लागल्या. त्यावेळचे अनुभव शंकरभाऊ सांगतात,

‘‘अक्षरशः बऱ्याच वेळा रात्री कंपनीत थांबून मोठमोठ्यांदा रडायचो. मन मोकळं करायचो.

विचार यायचा, स्वतःला संपवून टाकावं. त्यावेळी डोळ्यांसमोर यायचे ते सर्व कर्मचारीवर्गाचे चेहरे, बायको आणि मुलं… या अडचणीच्या काळात आमचा पीएफ उपयोगी पडला आणि त्या पैशांतून कामगारांचे पगार केले. त्याच वेळेस संपदा बँकेचेही हप्ते थकले होते. तेव्हा पत्नी कविताने गळ्यातलं मंगळसूत्रासह सर्व दागिने सोनाराकडे गहाण ठेवले. बँकेचे हप्ते भरले.’’

त्याचवेळी शंकरभाऊंचे मोठे भाऊ वाल्मीक यांनी या काळात संपूर्ण घराची जबाबदारी घेत त्यांना आधार दिला. त्यावेळेला त्यांनी, ‘दिवस बसून राहत नाहीत, तुझं काम करत राहा. मी पूर्ण कुटुंब सांभाळतो’, असं सांगून शंकरभाऊंचं मनोधैर्य वाढवलं.

… आणि पुन्हा कष्टाला फळ आलं. त्यांनी सलग १६ ते १८ तास काम दररोज करायला सुरुवात केली. सकाळी सात वाजता घर सोडायचं ते रात्री बारा ते एकलाच घरी जायचं. अक्षरशः सहा ते आठ महिने त्यांना त्यांच्या लहान मुलांनाही भेटता आलं नाही. या दहा वर्षांच्या तपश्चर्येचं फळ मिळालं आणि २००९- १० साली जे काम ते थर्ड पार्टी म्हणून करत असत, तेच काम त्यांना थेट मिळायला सुरुवात झाली. ‘मेसर्स व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड’ या कंपनीचा फ्रीज तयार करण्याचं काम त्यांना थेट कंपनीकडून मिळालं. काम वाढत गेलं तसं मनुष्यबळ आणि जागेचीही गरज भासली. सन २०१० मध्ये त्यांनी वीस हजार स्क्वेअर फुटांचं शेड विकत घेतलं. पुन्हा नवीन मशिनरी विकत घेतल्या. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. सन २०१४ – १५ पर्यंत त्यांनी फ्रिज तयार करणाऱ्या सर्व कंपन्यांच्या ऑर्डर मिळवल्या. ग्राहकांचा विश्वास बसल्यानं ‘अंकिता प्लास्ट कंपनी’चं नाव झालं. या क्षेत्रातला कामाचा व्याप वाढत होताच. सन २०१३-१४ नंतर मोठ्या भावाला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीशी संबंधित नवीन व्यवसाय सुरू करून दिला.

इथं प्लास्टिक ऑटोमोबाईल्स पार्ट तयार केले जातात. त्याच वर्षी ‘मेसर्स अंकिता पॉलिमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या

नावानं शंकरभाऊंनी नवीन कंपनी स्थापन केली. पुढच्याच वर्षी त्याहीपुढं पाऊल टाकत त्यांनी ऑटोमोबाईल्स क्षेत्रात काम सुरू केलं. कारच्या पार्ट्सचे पीयु आणि युव्ही कोटींग म्हणजेच प्लास्टिक आणि लोखंडी पार्टवर पेंटिंग करण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाला नाव दिलं, ‘मेसर्स अंकिता ऑटो कोटर्स’.

त्यानंतर गोदरेज आणि boyce mfg. co या फ्रिज तयार करणाऱ्या कंपनीच्या आग्रहाखातर त्यांनी कंपनीजवळच पुन्हा एक नवीन युनिट सुरू केलं, ‘एम एस जीनियस पॉलिमर्स इंडस्ट्रीज्’. त्यानंतर नवीन फर्म चालू केली. या फर्ममागची त्यांची संकल्पना अशी आहे- कस्टमर कंपनीच्या जवळ प्लॅन्ट उभारून त्यांना दर्जेदार सेवा देणे. त्याचबरोबर गाड्यांचं बंपर टचअप, दुरुस्तीचं काम सुरू केलं तसंच ऑटोमोबाईल पार्टच्या असेंब्ली करण्याचा व्यवसाय सणसवाडीत ‘श्रेया एंटरप्राइजेस’ या नावानं सुरू केला. व्यवसायाचा विस्तार एकाच भागात न राहता पुण्याच्या अनेक भागांमध्ये होऊ लागला.


सन २०१६-१७ मध्ये पिरंगुट, हिंजवडीमध्ये शंकरभाऊंनी एक नवीन युनिट सुरू केलं. या युनिटचं वैशिष्ट्य असं की, इथं तयार होणारे पार्ट्स हे खास पॉलिमरचे असतात. या ‘मेसर्स ग्लोबल पॉलिमर इंडस्ट्रीज’ युनिटमधले सर्व पार्ट परदेशात म्हणजे जर्मनी, ऑस्ट्रिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये निर्यात केले जातात. त्यांनी २०१८ साली ऑस्ट्रेलियामध्ये एक सेल्स ऑफिससुद्धा सुरू केलं आहे. त्यांनी ‘गोवर्धन पॉलिमर इंडस्ट्रीज’ या नावानं सणसवाडीत पुन्हा एक युनिट सुरू केलं आहे. या कंपनीमध्ये ईव्ही कार आणि टु व्हिलर्सच्या बॅटरीसाठी लागणारे प्लास्टीक पार्ट्स तयार केले जातात. या सर्व कंपन्या ते ‘एसजीए ग्रुप’ या नावाअंतर्गत चालवतात. आता त्यांचा टर्नओव्हर ३०० कोटी रुपये इतका आहे. एसजीए ग्रुप हा कार्पोरट पद्धतीने चालवला जात असून ९ कंपन्या या ग्रुपकडून चालविल्या जातात. एवढं करून न थांबता कोविडच्या लाटेमध्ये त्यांनी २०२० मध्ये आणखी एक युनिट तळवडे येथे ‘मे. ग्लोबल टुलिंग’ नावानं मोल्ड बनवण्याचं काम चालू केलं. तसंच टाटा मोटर्सनं आपला व्यवसाय गुजरात सानंद येथे विस्तार केल्यामुळं शंकरभाऊंना २०२३ मध्ये गुजरातमध्ये नवीन कंपनी सुरू करावी लागली. त्या कंपनीमध्ये टाटा नेक्सन आणि टाटा टियागोसाठी लागणारे सर्व प्लास्टीक पार्ट्स आणि गाडीचे पेंटेड पार्ट्स इजेंक्शन मोल्डिंग व पेंटिंग करून, त्या पार्टला असेंम्ब्ली करून पूर्ण पार्ट बसवून ते त्यांच्या ग्राहकांना पुरवतात. या कंपनीचं नाव, ‘मे. एस.जी. प्लास्टिक इंडिया प्रा. लि.’. या कंपनीतून टाटा आणि सुझुकी मोटर्स लि., एमजी मोटर्स लि.साठी सर्व ऑटोमोटिव्ह पार्ट्स तयार केले जातात.

कोणत्याही व्यवसायाचा कणा हा तेथील कर्मचारी वर्ग असतो. त्याला आपल्या कामात आनंद आणि सुरक्षितता मिळाली की, तो ती नोकरी सोडण्याचा विचारही करत नाही. शंकरभाऊंच्या प्रत्येक व्यवसायाचं वैशिष्ट्य असं की, त्यांच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एकदम घरच्यासारखी वागणूक दिली जाते. त्यामुळं त्यांच्याकडं एकदा कामावर आलेल्या व्यक्ती सहसा काम सोडून जात नाहीत.

कितीही मंदी आली, तरी त्यांनी कोणाही व्यक्तीला गेल्या २४ वर्षामध्ये कामावरून कमी केलेलं नाही.कोविड काळातही सर्व कर्मचारी वर्गाची एकदम घरातील कुटुंबासारखी काळजी घेतली. त्यांना लॉकडाऊनमध्ये संपूर्ण पगार दिला आणि काम नसतानाही कोणालाही कामावरून कमी केलं नाही.

तसंच कामगारांच्या कौशल्यात वाढ व्हावी म्हणून त्यांचं ज्ञान वाढवण्यासाठी त्यांना विविध प्रशिक्षण वर्गांना पाठवलं जातं. त्यानंतर त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार बढतीही दिली जाते.याच कारणांमुळं त्यांच्याकडं काम करणाऱ्या कोणालाही ‘आपल्याला नोकरीवरून कमी करतील’, अशी असुरक्षितता वाटत नाही.

अर्थातच सगळे तणावरहित असतात. आनंदानं आपलं काम चोख करतात. त्यांच्याकडं सुरुवातीला कामासाठी आलेल्या संजय पेटकर आणि नाना पेटकर यांची आता स्वत:ची ‘सानिका प्लास्टिक’ नावानं कंपनी आहे. म्हणजेच एका मराठी माणसानं व्यवसाय उभे करुन अनेकांना रोजगाराचा हात दिलाच; पण नवीन उद्योजकही तयार केले.

हेच शंकरभाऊंचं वैशिष्ट्य आहे.

हुश्श! मेंढ्या विकून सुरू केलेल्या शंकरभाऊंच्या व्यवसायाची वाटचाल पाहून आपण चकित होतो. थोडं अपयश मिळालेल्यांना सल्ला देतो-

पंछी, काहे हो तुम उदास। तू छोड ना मनकी आस।

भविष्यासाठी त्यांची मोठी स्वप्नं आहेत. एस.जी.ए. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा टर्नओव्हर २०२५-२६ पर्यंत ५०० कोटी करण्याचं उद्दिष्ट आहे. आता त्यांच्याकडं सात-साडेसातशे लोक काम करतात. त्या प्रत्येक कामगाराला त्याच्या हक्काचं घर देणं, त्याला मोटरसायकलवर कंपनीत येता येईल अशा प्रकारचं वेतन त्यांना देणं, ग्रुप कंपनीतल्या प्रत्येक कर्मचाऱ्यास चारचाकी घेता येईल इतकं आर्थिक दृष्ट्या सक्षम करणं, मेडिक्लेमची सुविधा… तसंच आताच्या असुरक्षिततेच्या काळात प्रत्येकाला नोकरीची सुरक्षितता देणं… अशा अनेक सुविधा देऊ करायच्या आहेत. तसंच मनुष्यबळ वाढवून हजार एक लोकांना रोजगार द्यायचा आहे.

शंकरभाऊ त्यांचा व्यवसायाचा डोलारा दीपस्तंभाप्रमाणे सांभाळत आहेत.

COMMENTS

error: Content is protected !!