दुग्ध व्यवसायाला शेतिपूरक व्यवसाय असं म्हटलं जातं, पण हा व्यवसाय पूरक नसून मुख्य व्यवसाय होऊ शकतो, हे ‘गोकुळ’नं दाखवून दिलंय. म्हणूनच राज्यातील उच्च दर्जाच्या गोकुळसारख्या स्थानिक सहकारी संघाच्या दुधाला पाठिंबा द्यायचा का बाहेरून आलेल्या खासगी दुधावर विश्वास ठेवायचा, हे ग्राहकानं लक्षात घ्यायला हवं. स्वत:चा ब्रँडनेम आणि तरुण दुग्ध व्यावसायिकांचा वाढता प्रतिसाद यामुळं घराघरांत गोकुळ नांदायला आता वेळ लागणार नाही.
मिसळीचा झणझणीत कट, तिखटजाळ्ळ तांबडा पांढरा, पाटपाण्याचा थाट, पैलवानांचा खुराक, खासबाग मैदानावरची कुस्ती आणि मुबलक दूध-दुभतं… ही ओळख कोणत्या जिल्ह्याची असेल, हे सांगण्याची गरज नाही. कोल्हापूरच्या मातीचं हे वैशिष्ट्यच आहे. देवी आंबाबाईचं छायाछत्र असलेलं हे गाव जितकं कानातून धूर काढणाऱ्या तिखट पदार्थांचं; तितकंच भरपूर प्रथिनं देणाऱ्या दुधाचं. दारात आलेल्या पावण्याला ‘पावणं वाईच जेवून जावा’, असं सांगणारे कोल्हापूरकर उत्तम दर्जाचंच खायला प्यायला घालणार, हे निश्चित. म्हणूनच ‘गोकुळ’सारखा अतिशय चांगल्या दर्जाच्या दुधाचा ब्रँड तयार होतो, तो कोल्हापुरातच! तब्बल साठ वर्षं हा ब्रँड ग्राहकांना चांगल्या प्रतीचं दूध पुरवत राहतो; दर्जाशी जराही तडजोड न करता; हे साधंसोपं आहे का? कधीही जा, बाराला जा, एकला जा, इथं ताजं दूधच मिळणार!

स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीआधी महाराष्ट्र राज्य दुधासाठी गुजरातवर अवलंबून होतं. तो मोरारजी देसाईंचा काळ होता. संयुक्त महाराष्ट्रच्या लढ्यानंतर राज्यातल्या जनतेला गुजरातच्या दुधावर अवलंबून राहायला लागू नये, म्हणून तसंच शेतकऱ्यांना गरिबीतून वर काढण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं राज्याच्या ग्रामीण भागातून दूध पुरवठा करायचं ठरवलं. एन. टी. सरनाईक व आनंदराव पाटील चुयेकर अशा मंडळींनी १९६३ साली कोल्हापूर जिल्ह्यात ‘करवीर तालुका मिल्क फेडरेशन’ ही संस्था सुरू केली. गोकुळची स्थापना करवीर तालुक्यात झाली, तेव्हा त्याचा कारभार तालुक्यापुरताच मर्यादित होता. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळचा विस्तार झालेला नव्हता.
१९७२ साली जिल्हा दूध संघ झाला आणि चुयेकरांनी या संघाला अढळ स्थानावर नेलं. ‘गोकुळ’नं जिल्ह्यातल्या गोठ्यांचं, शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या घरांचं शब्दश: ‘गोकुळ’ केलं.
थोडं मागं जायला लागेल. तसं पाहायला गेलं तर देशपातळीवर १९६५ साली लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्ड ही संस्था स्थापन करण्यात आली. त्याचं प्रमुखपद धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांना देण्यात आलं. तेव्हा त्यांनी ऑपरेशन फ्लड म्हणजेच दुधाचा महापूर ही योजना अमलात आणली. त्यानुसार तब्बल ७०० शहरं आणि जवळची गावं यातून दुधाचं जाळं निर्माण केलं. नंतर १९७० साली राष्ट्रीय पातळीवरही धवल क्रांतीचे वारे वाहत होते.
दुधाच्या क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीनं ग्रामीण भागातील नागरिकांनी शहरी भागातील नागरिकांनी विकासाची फळं चाखायला हवीत, असं डॉ. भारतातील धवलक्रांतीचे
जनक डॉ. वर्गीस कुरियन यांचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी धवलक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस यांना धवलक्रांती किंवा श्वेतक्रांतीचं ‘आनंद मॉडेल’ देशभरात राबवण्यास सुरुवात करा, असं सांगितलं. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातही धवलक्रांतीचे वारे वाहायला लागले. त्यावेळी वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. दुधाच्या अधिकाधिक उत्पादनाची आणि व्यापक स्वरुपातील विक्री व्यवस्थेची निकड लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध व्यवसाय विभागानं दुग्धशाळांच्या विकासावर विशेष भर देण्याचं ठरवलं. सन १९६०-६२ च्या दरम्यान, मिरज, कोल्हापूर, धुळे, अहमदनगर, नागपूर, औरंगाबाद इत्यादी शहरांमध्ये शासकीय दूध योजना सुरू झाल्या.

त्यापूर्वी मुंबई शहरासाठी १९५१ सालापासूनच आरे येथे दुग्ध वसाहतींची स्थापना आणि दररोज अडीच लाख लीटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या आरे दूध डेअरीची सुरुवात झालेली होती. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे १९६१ साली युनिसेफच्या सहकार्यानं वरळी दुग्धशाळेचा प्रकल्प आकारास आला. शासनाच्या दुधव्यवसाय विकास विभागाने महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांच्या आणि जिल्ह्यांच्या ठिकाणी लहान व मध्यम क्षमतेची शीतकरण केंद्रं उभारली.
जिल्ह्याजिल्ह्यातून उत्पादित दुधाचं संकलन केल्यानंतर त्या दुधावर शास्त्रीय पद्धतीनं प्रक्रिया करून स्थानिक गरज भागविल्यानंतर उरलेलं जादा दूध मोठ्या शहरातील ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी ३८ शासकीय दुधशाळा व ८१ दूध शीतकरण केंद्रं स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी महाराष्ट्रातील सर्व दूध उत्पादक संस्थांची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य दूध महासंघाची स्थापना १९६७ मध्ये करण्यात आली होती. त्यास नंतर सुधाकरराव नाईक आणि शरद पवार यांनी प्रोत्साहन दिलं. त्यावेळी दुधाचे जे ब्रँड उदयाला आले, त्यातला एक होता गोकुळ.
उत्तम दर्जा आणि ताजेपणासाठी गोकुळ ब्रँडचं नाव होऊ लागलं. गोकुळशी एक घराणं जोडलं गेलं- डोंगळे यांचं. गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचं संपूर्ण कुटुंब मागच्या पिढीपासून ‘गोकुळ’शी जोडलेलं आहे. ते गोकुळची वाटचाल सांगतात; ती रंजक अशीच आहे.
गोकुळ हा जुना दूध संघ आहे. माझे काका आणि भाऊ यांच्यापासून सगळे गोकुळशी जोडलेले आहोत. मी तरुण असताना हा संघ लहान असला तरी माझं तिथं येणंजाणं होतं. काका आणि भाऊ संचालक मंडळात असल्यानं विद्यार्थीदशेपासूनच या संघाशी या ना त्या कारणानं जोडला गेलेलो. व्हीनस कॉर्नर ही या दूध संघाची जुनी जागा होती. सुरुवातीला दररोज साताठशे लीटर दुधाची क्षमता असलेल्या या संघात आता सतरा-अठरा लाख लिटर दूध येतं.
सहकार ही पश्चिम महाराष्ट्राची ओळख आहे. इथं सहकार रुजला, वाढला आणि या क्षेत्रातल्या काही संघांनी सहकार चळवळीचं बावनकशी सोनं करून दाखवलं. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ हे त्याचं उदाहरण. गोकुळ शिरगावमध्ये २५ एकर जागेत डेअरी सुरू झाली. उद्घाटनाच्या दिवशी चुयेकर यांनी ‘गोकुळ’ या शब्दाचा आपल्या भाषणात उल्लेख केला आणि या ब्रँडला गोकुळ हे नाव मिळालं. श्रीकृष्णाचं गायी-गुरांनी, दूध-दुभत्यानी समृद्ध असलेलं गोकुळ होतं ना, तेच गोकुळ महाराष्ट्रात अवतरलं.

हळूहळू गोकुळनं आपला विस्तार वाढवत नेला. कोल्हापूर जिल्हा आणि नंतर इतर जिल्ह्यांमध्येही गोकुळ पोहोचलं. दुधाच्या दर्जामुळे ग्राहकांच्या पसंतीस गोकुळ दूध उतरलं आणि ग्राहकांबरोबरच दुधउत्पादक, तसंच कर्मचारी वर्गही वाढत गेला. दूध उत्पादन आणि त्यात महिलांचा सहभाग हे अतूट नातं आहे. कोल्हापुरी लोक कष्टाळू आहेत. कुठलंही क्षेत्र असो, कोल्हापुरी साज, शेती, गूळ, दूध… त्यात कायम आपल्या स्वत:च्या पायावर उभं राहिलेलं आहे. कुठल्याही अडचणीला आव्हान देण्याची क्षमता कोल्हापूरकरांच्या मनगटात आहे. गोकुळनं दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा हात दिलाच; पण महिला सक्षमीकरणाचाही वसा घेतला. ‘महिलांचा विकास’ ही संकल्पना महाराष्ट्रात सर्वांत आधी ‘गोकुळ’नं राबवायला सुरुवात केली. शेती किंवा दूध व्यवसाय, यात महत्त्वाची सगळी
कामं महिला करतात. गोठा स्वच्छ करणं, जनावरांना चारा-पाणी-पशुखाद्य देणं, गाई-म्हशींचं दूध काढून ते डेअरीपर्यंत पोहोचवणं… ही सगळी कामं महिला करतात. सन १९९२ – ९३ पासून महिलांचा गोकुळमधील सहभाग सुरू झाला. महिलांनी सहकारी संघाच्या मदतीने दुभती जनावरं घेतली. सध्या गोकुळच्या माध्यमातून या महिलांची दरमहा ८० कोटी रुपयांची उलाढाल होते आहे.

गोकुळनं गावपातळीवर जाऊन शेतकऱ्यांचं, महिला भगिनींचं हित साधण्याचा प्रयत्न केला. दूध उत्पादकांना अवघ्या दहा दिवसांत त्यांचं पेमेंट मिळतंय. महिला स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून त्यांना म्हशी विकत घेण्यासाठी, व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज दिलं जातंय. डोंगळे सांगतात की, ‘‘गोकुळमध्ये गायीच्या दुधाबरोबरच म्हशीच्या दुधालाही अधिक महत्त्व आहे. म्हशीच्या दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील संलग्न दूध उत्पादकांना त्यासाठी माहिती, प्रशिक्षण दिलं जातंय. दहा वर्षांपूर्वी मी अध्यक्ष होतो, तेव्हा गावपातळीवर गोठे, डेअरी असत, तिथं ‘गोकुळ आपल्या दारी’ ही संकल्पना राबवली होती. त्याचा चांगला उपयोग झाला होता.
आता ‘चेअरमन आपल्या गोठ्यात’ हा उपक्रम राबवतोय. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतोय. त्यांच्याशी चर्चा करतोय. त्यांना ही बाब फार महत्त्वाची वाटतेय. त्यांना त्यातून ऊर्जा मिळतेय.’’
डोंगळे यांनी अवघ्या एका वर्षात जिल्ह्यातील सुमारे १२५ गोठ्यांना भेट देऊन त्यांना मार्गदर्शन केले, दूध उत्पादकाकडून येणाऱ्या सूचना ऐकल्या आणि गोकुळच्या सुरू असणाऱ्या विविध अनुदान योजनांमध्ये बदल करून त्यांचं बळकटीकरण केलं. गोकुळची आता ‘पेपरलेस यंत्रणे’कडं वाटचाल सुरू आहे. स्वत:चं ॲप आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही, असं त्यांना वाटतं. ‘स्मार्ट वर्क’ वर त्यांचा विश्वास आहे. त्यांनी दूध संघात सौर उर्जेच्या वापरालाही सुरुवात केली आहे. त्यामुळं दर लिटरमागे खर्च कमी होतोय. ५० टक्के उर्जेची बचत होतेय. महत्त्वाचं म्हणजे एमएसईबीचं बील कमी येतंय. दूध साठवणूक, आणि अन्य प्रक्रियांसाठी वीज लागतेच; पण त्याला सौर ऊर्जा हा शाश्वत पर्याय शोधला आणि स्वीकारला आहे.


गोकुळ संघाशी संलग्न असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना फक्त कर्ज रुपानं मदत करत नाहीत, तर त्यांना सर्व प्रकारचं मार्गदर्शनही केलं जातं. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, याची काळजी घेतली जाते. गोकुळ ब्रँडचं म्हशीचं दूध प्रसिद्ध असल्यामुळं म्हशीचं दूध वाढायला हवं, यासाठी विशेष मेहनत घेतली जाते. सर्व जनावरांना पशुखाद्य एकाच दर्जाचं पुरवलं जातं. म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रमांतर्गत युवा दूध व्यावसायिकांचा सहभाग वाढेल, यासाठी प्रयत्न केले जाताहेत. चांगल्या प्रतीचं दूध ग्राहकांना देण्यासाठी हर्बल पशुपूरकवर उपचारावर भर दिला जातोय. पूर्वी ‘आजीचा बटवा’ प्रसिद्ध होता, या बटव्यातील घरगुती वापरातली आयुर्वेदिक औषधं दिली जात होती. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोलून आणि त्यांच्या संशोधनातून हर्बल पशुपूरक तयार केलं जातंय. महिला वर्ग जनावरांची काळजी घेत असल्यानं त्यांच्यासाठी खास ‘मायक्रो ट्रेनिंग सेंटर’ काढलेली आहेत. तिथं त्यांना प्रशिक्षण आणि माहिती दिली जाते. इतकंच नाही तर वेगवेगळ्या सहलींच्या माध्यमातून त्यांना अद्ययावत बाबींची माहिती करून दिली जातेय. गोकुळनं शेतकऱ्यांसाठी विमा संरक्षण असावे म्हणून ‘किसान पॅकेज’ तयार केलंय. जो शेतकरी जनावरांचं संगोपन, दूध उत्पादन यात चांगलं काम करुन दाखवतो, त्याला किसान पॅकेज दिलं जातंय. त्याला अनुदानाचा लाभ करून दिला जातोय.

शेतकरी डोंगळे यांच्याकडं अनेक प्रश्नं घेऊन येतात. त्यात जनावरांच्या आजारपणाचेही प्रश्नं असतात. ते त्वरीत सोडवले जातात. त्यासाठी सर्व संलग्न शेतकऱ्यांना चोवीस तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध आहे तसंच जंतनिर्मूलनासाठी आणि संसर्गजन्य आजार होऊ नयेत म्हणून सामूहिक जंतनिर्मूलन व लसीकरण ही सेवा दिली जाते. गोचीड, गोमाशी, माश्या यांच्यामुळं होणारे आजार तसंच लाळ्या खुरकुत, लंपीसारखे साथीचे आजार होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेण्यासठी मार्गदर्शन केलं जातं. वातावरणातील बदलामुळंही म्हशींची आणि गायींची दूध उत्पादनाची क्षमता कमी होऊ शकते. तसंच चारा टंचाई, वांझपणाच्या समस्या, थायलोरिॲसिस, स्तनदाह या आजारांचाही परिणाम उत्पादनावर होऊ शकतो.
तसंच बरेचदा म्हशींच्या आहारात पोषक तत्वांची कमतरता असल्यास दुधाचा दर्जा घसरु शकतो. म्हणून यावर वेळीच उपाययोजना केली जाते. संघाच्या वैरण विकास विभागाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. सुधारित चारा पिकांच्या बियाणांचं व कांड्यांचं शेतकऱ्यांना वाटप केलं जातंय. मका, शाळु (उच्च प्रतीची ज्वारी), हत्ती गवत, लसूण घास, कडवळ यांचा समावेश चाऱ्यात केला जातोय. म्हैस खरेदी आणि वासरु संगोपनाबाबत लवचिक धोरण ठेवून उत्पादकांना ठराविक रकमेबरोबर पशुखाद्य मिनरल मिक्श्चर टी एम आर – तसंच वासरांसाठी फीडिंग पॅकेज उपलब्ध करुन दिले जात आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात ८ लाख ५० हजार जनावरं आहेत परंतु, दुधाचं उत्पादन जनावरांच्या संख्येच्या दृष्टीने कमी आहे. उत्पादन कमी असण्याचं आणखी एक कारण म्हणजे म्हशींमधला वांझपणा. तो कमी होण्यासाठी तपासणी व उपचार शिबिरं संघामार्फत आयोजित केली जातात. पुण्यातील उरुळी कांचन येथील बायफ या स्वयंसेवी संस्थेबरोबर म्हशींमधील उत्पादकता वाढवण्यासाठी गोकुळ संघ सध्या संशोधनात्मक उपक्रम राबवत आहे. सर्व गावांना माफक दरात आणि चांगली कृत्रिम रेतन सेवा मिळावी, या उद्देशानं संघानं सुधारित कृत्रिम रेतन सेवा २०२४ पासून सुरू केली आहे. गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क येथील रोगनिदान प्रयोगशाळेत अनेक प्रकारची संशोधनं सुरू असतात.
जातिवंत जनावरांची पैदास यावर गोकुळ संघ नेहमीच भर देत आलेला आहे. जनावरांना पोटभर चारा मिळतोय का, प्रत्येक गोठ्यात मोकळी-खेळती हवा आणि चांगला उजेड आहे का, गोठे कोरडे आहेत का, गोठ्यात पिण्याचं स्वच्छ पाणी चोवीस तास असतं का, हे डोळ्यांत तेल घालून पाहिलं जातं.
संतुलित आहाराच्या दृष्टीनं हिरवा चारा मिळावा यासाठी मुरघास तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. याचा परिणाम म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात ५० हजार टन मुरघास तयार झाला आहे. शिंदेवाडी, हसुरचंपु या वैरण बँकेमार्फत शेतकऱ्यांकडून मका घेऊन त्याचे मुरघास तयार केले जाते. या सगळ्या काटेकोर उपाययोजनांमुळं गोकुळचं दूध दर्जेदार आहेच; शिवाय त्यामुळं दूध व्यवसायात भविष्य उज्ज्वल असल्याचं शेतकऱ्यांनाही समजलंय. त्यामुळं दूधव्यवसाय हा दुय्यम न राहता कित्येकांचा प्रमुख व्यवसाय झाला आहे.
‘मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोजेक्ट’ या योजनेअंतर्गत करवीर तालुक्यातील चुये पंचक्रोशीतील दहा गावांमध्ये १२० बायोगॅस प्रोजेक्ट बसवले आहेत. बायोगॅसमधून बाहेर पडणाऱ्या स्लरीपासून शेतीपूरक उत्पादनं तयार केली जातात. ही स्लरी महिला वर्ग विकतो आणि दूध संघ विकत घेतो. महिलांच्या बँक खात्यांमध्ये त्याचे पैसे जमा केले जातात.

दूध उत्पादनापासून प्रक्रियेपर्यंत काटेकोर नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या गोकुळ दूध संघाला आयएसओ २२०००:२०१८ हे फुड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टिमचं मानांकन दिलं आहे. हे सर्टिफिकेट मिळवणं अवघड असतं. या मानांकनासाठी अनेक चाचण्यांमधून जावं लागतं. दूध उत्पादन,
संकलन प्रक्रिया, पॅकेजिंग, पदार्थ निर्मिती यातील प्रत्येक प्रक्रिया तावुन सुलाखून घेतल्यावरच हे सर्टिफिकेट मिळतं. महाराष्ट्रात सहकारी चळवळीच्या माध्यमातून दुधव्यवसाय रुजलेला आहे, पण आता खासगी कंपन्याही यात उतरल्या आहेत.
अंतर्गत स्पर्धेचा आणि राजकारणाचा फटका मराठी माणसाला नेहमीच बसलाय. अंतर्गत स्पर्धेमुळं बाहेरुन येऊन शिरजोर झालेले अनेक व्यवसाय मराठी माणसानं पाहिलेत. त्यामुळं राज्यात बाहेरुन अनेक दूध संघ येऊन शिरकाव करताना दिसताहेत. त्यांचा सर्व छोट्या मोठया दूध संघांनी एकत्र येऊन मुकाबला करायला हवा, असं डोंगळे यांना वाटतं. कर्नाटकमध्ये नागरिकांनी एकत्र येऊन गुजरातेतील एका बलाढ्य दूध संघाला विरोध केला. परिणामी, नंदिनी ब्रँडला चालना मिळण्यास मदत झाली. महाराष्ट्रातही तसंच करावं लागेल, असं त्यांचं प्रामाणिक मत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचं मोठं जाळं उभं केलं होतं. इथं सहकाराला मोठं प्राधान्य आहे. सहकार क्षेत्र प. महाराष्ट्रातच का रुजलं,याचा अभ्यासही अनेक अभ्यासकांनी केला आहे. पण असं असलं तरीही सहकार क्षेत्राला अनेकांची दृष्ट लागली. अनेक सहकारी संस्था अवसायानात निघत आहेत. त्याबाबत सरकारनं गांभीर्यानं दखल घेण्याची गरज आहे. आजतागायत कोणत्याही सरकारनं त्यासाठी काही केलं नाही. दुधासाठी कोणतंही खास धोरण वापरलं नाही, आता त्याची आवश्यकता आहे. सहकार क्षेत्रात विश्वासार्ह संचालक आले तरच सहकार टिकेल, असं प्रांजळ मत डोंगळे व्यक्त करतात.
दूध उत्पादनात आता कोल्हापूर जिल्ह्यात तरुणांचा सहभाग वाढतोय. तरुण दूध उत्पादक नवनवीन तंत्र वापरत आहेत. त्या माध्यमातून दुधाचा दर्जा आणि उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही खूप जमेची गोष्ट असल्याचं त्यांना वाटतं. अलिकडे
राज्यात नोकरी करणं म्हणजे जगण्याला स्थैर्य येणं असं मानलं जातं. पण लोकसंख्या इतकी आहे की, सगळ्या हातांना नोकरी मिळणं अवघड आहे. ग्रामीण भागात बरेचदा नोकरी असेल त्याला लग्नासाठी मुलगी मिळतेय, असं चित्र दिसतंय. पण आता या विचारसरणीत बदल केला पाहिजे. नोकऱ्याही आता कंत्राटी पद्धतीच्या असल्यानं त्यात स्थैर्य आणि आर्थिक सुरक्षितता उरलेली नाही. अशा वेळी जो शाश्वत आहे अशा दूध उद्योगाकडं तरुणांनी वळायला हवं आणि लग्नाळु मुलींनी त्यांच्या अपेक्षांच्या रकान्यातही बदल करायला हवा, असं त्यांना वाटतं. कारण कित्येक तरुण सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दूध उत्पादन वाढवत असल्यानं त्यांचं उत्पन्नही आकर्षक असंच आहे. भारतात तिसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर सध्या गोकुळ हा ब्रँड आहे. ब्रँडनेम तयार होणं आणि नावारुपाला येणं फार महत्त्वाचं असतं. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून उभ्या केलेल्या गोकुळ ब्रँडची पत दिवसेंदिवस वाढतेच आहे. गोकुळची मुंबईत स्वत:ची डेअरी आहे; ती संघाला विस्तारायची आहे. पुण्यात त्यांना स्वत:ची डेअरी उभी करायची आहे.
महाराष्ट्रभर सहकाराचा झेंडा सकारात्मक पद्धतीनं रोवायचा आहे. तसंच ‘गोकुळ’ ब्रँडचं दुसरं नाव दर्जा आणि प्रामाणिकपणा; त्यामुळं गोकुळला भविष्यात स्वत:ची डेअरी विकसित करायचीय. गोकुळमुळं पोटापाण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकरी स्थलांतर करत नाहीयेत. शेतकऱ्यांचा मुलगा आता दुय्यम दर्जाची नोकरी शोधायला शहरात जात नाही. शहरांवरचा लोकसंख्येचा बोजा वाढत नाहीये. कारण त्यांना गावात राहूनच व्यवसाय करायला मिळतोय. पारंपरिक पद्धतीत बदल करुन सामुदायिक डेअरीचा व्यवसाय सुरु करता येईल का, याबाबत आता ‘गोकुळ’चे प्रयोग चालले आहेत. माणसं बदलली, तरी यंत्रणा बदलत नाही. संचालक, उत्पादक, अधिकारी, ग्राहक या साखळीत गोकुळचं चांगलं नाव आहे. शहरी ग्राहक वर्गात लोकप्रियता लाभलेलं गोकुळ दूध घरोघरी पोहोचतंय. खऱ्या अर्थानं या घरांचं ‘गोकुळ’ होतंय.

COMMENTS