उरुळीच्या कोंदणातील ‘कांचन’ : महादेवअण्णा कांचन

उरुळी म्हणजे मांगल्याचे प्रतीक असलेली तांबड्या मातीची गोलाकार वाटी. या वाटीत आयुर्वेदिक औषधी तयार केल्या जातात किंवा त्यात सुगंधित फुलं टाकून सजवली जातात. आयुर्वेद, सकारात्मक ऊर्जा, शेतीवाडी, गायी-गुरे यांच्या शाश्वतेचे प्रतीक असलेल्या उरुळी कांचन या तेजोमय परिसरात सहकार, उत्तम व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शिक्षणसंस्था, जोडधंदे, आरोग्य यंत्रणा यांची जोड पाहायला मिळते. ती जोड देणाऱ्या उद्योजक महादेवअण्णा कांचन यांच्या कार्यामुळं ग्रामसेवेचं गांधीजींचं स्वप्न आपण काही अंशी तरी प्रत्यक्षात उतरल्याचं पाहतो.

हीच भावना अण्णांची आहे. कारण गांधीजींचं तत्त्वज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणणारे उरळी कांचनचे महादेवअण्णा कांचन हे खऱ्या अर्थाने गांधीवादी आहेत.

पुणे जिल्ह्यातल्या उरुळी कांचनमधल्या निवासस्थानी आपण त्यांना आपलं काम घेऊन भेटायला जातो, तेव्हा आपलं प्रसन्न चेहऱ्यानं स्वागत करणारे व्यक्तिमत्त्व.

सत्तरीच्या आसपास असले, तरी रोज त्यांचा दिनक्रम पहाटे चारला सुरू होतो. पहाटे पाचला ते तासभर विहिरीत पोहतात. सकाळी सात वाजताच त्यांचं जेवण होतं. सकाळी ८ वाजता अण्णा त्यांच्याकडं जाणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तयार असतात. तेव्हापासून दिवसभर ते लोकसेवेत व्यग्र असतात.

उरुळी कांचन सुमारे साठ वर्षांपासून गांधीजी आणि त्यांचे शिष्य पद्मश्री मणीभाई देसाईंनी सुरू केलेल्या निसर्गोपचार केंद्रामुळे प्रसिद्ध आहे.

त्याबरोबरच बाएफ या शाश्वत ग्रामविकासासाठी काम करणाऱ्या संस्थेतल्या वेगवेगळ्या प्रयोगांसाठी प्रसिद्ध आहे. मणीभाई देसाई यांचं सान्निध्य मिळालेले आणि गांधीजींचं तत्वज्ञान अंमलात आणण्याचा प्रयत्न करणारे महादेवअण्णा कांचन यांच्या कार्यकर्तृत्वामुळेही ते आता प्रसिद्ध झालंय.

या गावात २ जून १९५५ रोजी एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्म झालेला एक मुलगा मोठेपणी गावातल्याच अनेकांचा दिशादर्शक, तरूणांच्या भव्यदिव्य स्वप्नांची पूर्तता करणारा उद्योजक होतो, तसंच शिक्षणमहर्षी होतो, तेव्हा या गावाचं नाव सार्थकी लागलेलं असतं. खरं तर कांचन कुटुंबाचा इतिहास सांगायचा तर आपण थेट मध्य प्रदेशातील धार आणि राजस्थानातील परमार या क्षत्रीय राजघराण्यापर्यंत जाऊन पोहोचतो. मूळचं राजघराणं असलं तरीही कांचन यांची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य शेतकऱ्यांसारखीच होती. त्यांनी आपल्या वडिलांबरोबर काबाडकष्ट करून स्वत:ची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला.

साधारण पन्नास-साठच्या दशकातलं एक साधंसुधं गाव. या गावाचं वैशिष्ट्य असं की, गावाला स्वातंत्र्य मिळण्याआधी एक वर्ष- १९४६ साली गांधीजी त्यांचे शिष्य मणीभाई देसाई यांच्यासह इथं सात दिवस येऊन राहिले. तेव्हा गावाचं वातावरणच गांधीमय झालेलं. गांधीजींनी मणीभाईंना या गावातच राहून ग्रामसुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं. गुरू तसे शिष्य! गांधीजींच्या आज्ञेप्रमाणे मणीभाईंनी आपलं सगळं आयुष्य उरुळी कांचन परिसरातील लोकांसाठी वाहिलं.

या गावाची सगळी जडणघडण मणीभाईंच्याच मार्गदर्शनाखाली झाली. त्यांनी १९५० साली इथं ‘महात्मा गांधी सर्वोदय संघा’ची स्थापना केली. या संघामार्फत महात्मा गांधी विद्यालय ही शाळा सुरू करण्यात आली. सर्वोदयी विचारांनी चालणारी ही शाळा म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण नव्हे; तर विद्यार्थ्यांच्या जगण्याला दिशा देणारं ज्ञानमंदिरच! त्यामुळं गांधींना प्रत्यक्षात पाहिलं नसलं, तरी महादेवअण्णांना शाळेतच गांधीजींच्या सर्वोदयी तत्त्वज्ञानाचा परीसस्पर्श झालेला होता. शालेय शिक्षणाला वास्तवातल्या जगाची जोड होतीच. कष्टप्रद आयुष्य आणि एखादं सुरेल तत्त्वज्ञान जेव्हा हातात हात घालून समोर उभं ठाकतं, तेव्हा घडतं ते महादेवअण्णांसारखं कणखर नेतृत्व.

महादेवअण्णा घरात सर्वांत लहान. घरचा थोडा जमिनीचा तुकडा, त्यावर बारा महिने त्यांचे आई-वडील दिवसरात्र काबाडकष्ट करायचे. नंतर गावात मुठा कालवा आल्यावर ही शेती बाराही महिने कसली जाऊ लागली. घरात सर्वांत लहान असले, तरी तेही लहानपणी आई-वडील आणि दोन बहिणींसह शेतात काम करायचे. घरच्या शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं त्यांचे वडील दुसरीकडं सालावर कामाला जात.

त्यांचं हे घरासाठीचं राबणं महादेवअण्णांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी पक्कं बसलं होतं. चांगलं आयुष्य जगायचं असेल, शिक्षण घ्यायचं असेल, तर शेतीबरोबर इतर पूरक व्यवसाय पैसे मिळवून देऊ शकतात, हे त्यांच्या तरूण वयातच लक्षात आलेलं होतं. त्यांच्या आई कडक शिस्तीच्या होत्या. ‘कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. माझ्याबरोबर काम केलं तर जेवायला देईन,’ ही त्यांच्या आईची धारणा असायची. त्यांच्या आईंनी त्यांना याचा अनुभव दिलेला होता. त्यांच्या आईंचा दिवस पहाटे तीन वाजता सुरू व्हायचा. जात्यावरचं दळण, सडा-शिंपण, घरकाम आणि शेतात अफाट कष्ट करणाऱ्या त्यांच्या माऊली ‘काम केलं तरच गणेशोत्सवात जाण्याची परवानगी देईन,’ असं नेहमी अण्णांना म्हणायच्या. त्यांच्यामुळं महादेवअण्णांना श्रमाचं महत्त्व समजलं आणि मुख्य म्हणजे कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासूनही ते लांब राहिले, ते आजतागायत! आपण सुजाण झालो, सुशिक्षित झालो तर त्याचा लाभ आपल्या घराला मिळतोच, पण आपल्या भवतालचा परिसरही आपण शहाणा करून सोडतो, हे त्यांच्या वाटचालीतून आपणही शिकत जातो.

जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर सर्वोदय संघाच्या माध्यमिक शाळेतून शिकून ते १९७३ साली अकरावी उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांना साखर कारखान्यात चिटबॉय म्हणून काम मिळालं. तेव्हा त्यांच्या घरादाराला खूप आनंद झाला होता. कारण घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती.

नोकरीमुळं घरात नियमित पगार तरी येणार होता. चिटबॉय म्हणजे ऊसतोडणी कामगारांचा प्रमुख. हे काम करता करता ते स्लिपबॉय म्हणूनही हंगामी काम करायला लागले. चार पैसे दिसायला लागले, पण नोकरी करणं आणि त्यावरच समाधान मानणं हे अण्णांच्या रक्तातच नव्हतं. त्यांनी आपली नोकरी मनापासून केल्यानं त्याची चांगली फळं दिसू लागली.

पाच वर्षं स्लिपबॉय म्हणून काम केल्यानंतर ते तिथंच मुकादम झाले. आयुष्यात आपण घेतलेले अनुभव आणि केलेलं काम भविष्यकाळात नक्कीच उपयोगी पडतं, असं म्हणतात. तसंच त्यांच्या बाबतीत घडलं.


त्यानिमित्ताने त्यांनी साखर कारखान्यातील ऊसतोडणी कामगारांचं, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं जवळून पाहिलं. त्यांच्या समस्यांची त्यांना जाणीव झाली. तसंच कारखान्यात जबाबदारीच्या पदावर काम करताना व्यवस्थापनाच्या खाचाखोचाही त्यांना समजल्या. दोन्ही बाजू सांभाळलेली व्यक्ती अधिक प्रगल्भ होते, समतोल विचार करते, तसंच अण्णांच्या बाबतीत घडलं. कोणतीही परिस्थिती हाताळण्याचं कसब त्यांच्यात आलं. शेतकरी, ऊसतोड कामगार, त्यांचे मुकादम यांच्या संपर्कात राहिल्यानं लोकसंग्रह वाढत गेला.

अण्णा फक्त कारखान्यातल्या नोकरीवरच समाधान मानणाऱ्यांतले नव्हते. त्यामुळं दूध व्यवसायातही त्यांनी लक्ष घातलं. त्याचं आणखी एक कारण म्हणजे एकट्या शेती व्यवसायावर कुटुंबाचा खर्च भागू शकत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी शेतिपूरक असा जोडव्यवसाय हवाच, या मताचे ते आहेत. पूरक उद्योगांतून शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ होईल, हे लक्षात आल्यानं अडगळीत पडलेली एक दूध उत्पादक संस्था ताब्यात घेऊन त्यांनी ती उर्जितावस्थेत आणली. त्याचं झालं असं, डॉ. नारायणराव भोर यांनी सुरू केलेली दूध संस्था बंद पडली होती. मणीभाईंच्या मार्गदर्शनाखाली ती पुनरुज्जीवित करण्यात आली. या संस्थेचं चेअरमनपद महादेवअण्णांकडं आलं, तेव्हा या संस्थेचा त्यांनी अक्षरश: कायापालट केला.

तसंच दूधउत्पादक शेतकऱ्यांना आंबोण, पेंड, भुसा कमी दरानं उपलब्ध करून दिला. उरुळी कांचनजवळील २५-३० गावांपर्यंत हा दूध व्यवसाय विस्तारला.

प्रत्येक पाच-सहा किलोमीटरवरील यवत, कुंजीरवाडी, लोणी काळभोर अशा दूध संकलन केंद्रांवर परिसरातले शेतकरी दूध आणून देत. या संघानं लवकरच जवळपास हजार शेतकरी जोडले.

दररोज दोन-तीनशे लीटरपासून झालेली सुरुवात १८ हजार लीटरपर्यंत कधी येऊन पोहोचली, ते समजलंच नाही. शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेतून दिल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसायाबाबतच्या कर्जांना संस्था हमी देत असे. यातून शेतकऱ्यांची पत वाढली. ही दुग्धसंस्था दर पंधरा दिवसांनी शेतकऱ्यांना पैसे द्यायची. महिन्याच्या ५ आणि २० या तारखांना होणाऱ्या या पेमेंटमध्ये कधीही विलंब झाला नाही. उसाचं पेमेंट वर्षातून किंवा १८ महिन्यांनी व्हायचं, अशावेळी दुधातून मिळालेला हा पैसा शेतकऱ्याच्या कुटुंबाचा दैनंदिन खर्च चालविण्यासाठी उपयोगी पडायचा. महादेवअण्णांनी या संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. जिल्ह्यात सर्वाधिक दुग्धसंकलन करणारी संस्था म्हणून ही ‘श्रीकृष्ण सहकारी दूध उत्पादक संस्था’ प्रसिद्ध झाली. पुणे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आदर्श म्हणून या संस्थेकडं पाहिलं जात होतं. सरकारी संस्था, एबीसी फार्म, कॅडबरीसारख्या खाजगी कंपन्यांना ही संस्था दूध पुरवत होती. त्यातून दूध उत्पादकाला जादाचा भाव दिला जात होता. आज या संस्थेची उरुळीकांचनमध्ये उभी असलेली इमारतच कोट्यवधी रुपयांची आहे. आता सहकारी दूध व्यवसायाला पूर्वीचे ते दिवस राहिलेले नाहीत, पण श्रीकृष्ण सहकारी दूध संघाचं नाव अजूनही मानाने घेतलं जातं.

काहीतरी कुठंतरी कमी होतं. कोणतीही नवीन आव्हानं पेलण्याची तयारी असलेल्या अण्णांना त्यांचे गुरू अजून भेटायचे होते. ते वर्ष होतं, १९८०.

युनोमधली लाखो रुपयांची नोकरी सोडून शेतकऱ्यांचा लढा लढण्यासाठी शरद जोशीसाहेब तेव्हा महाराष्ट्रात आले होते. त्यांच्या सहवासाने उरुळी कांचनमधील अनेक तरूण अत्यंत प्रभावित झाले होते. त्यातील प्रमुख नाव होतं, महादेवअण्णा कांचन. शरद जोशीसाहेबांचे शेतीबाबतचे विचार ऐकून लोक भारावून जात. त्यात तरूण वर्ग मोठ्या प्रमाणावर होता. महादेवअण्णांच्या डोळ्यांसमोर ते ऐकताना भविष्यातील आपल्या गावाचं चित्र येत असे. आपले गावही शेती, शिक्षण, रोजगार… अशा अनेक बाबतीत स्वयंपूर्ण असलं पाहिजे, अगदी गांधीजींच्या स्वप्नातील गावासारखं! आपणच कुठून तरी सुरुवात करायला हवी, असं त्यांना वाटलं.

सन १९८५ पर्यंत शरद जोशी यांच्या ‘शेतकरी संघटने’त त्यांनी काम केलं. संघटनेच्या अनेक कांदा, ऊस, दुधाच्या प्रश्नांवरील आक्रमक आंदोलनांत त्यांनी भाग घेतला. पुणे-सोलापूर रास्ता रोको आंदोलनाला अफाट यश मिळालं.

शेतकऱ्यांना कारखान्याकडून मिळणारी २०० रुपये प्रतिटनाची उचल ४०० रुपये प्रतिटन अशी दुप्पट झाली. त्यात एक वेगळी घटना घडली. महादेवअण्णा नोकरी करत असलेल्या थेऊरच्या यशवंत साखर कारखान्यातील प्रस्थापित संचालक मंडळाच्या विरोधात आंदोलन सुरू झालं. या संघर्षात अण्णांनी नोकरीचा राजीनामा दिला. शरद जोशीसाहेब यांच्या विचारांनी त्यांच्यात घडवलेला हा बदल होता. ‘मुंगी होऊन साखर खावी, कुठे हत्ती होऊन ओंडके ओढतो’, असं त्यावेळी अण्णांचे कारखान्यातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले होते. पण संघर्ष अंगात भिनलेले अण्णा आता त्यापलीकडं गेलेले होते.


थेऊर साखर कारखान्याची त्यावेळची निवडणूक चांगलीच गाजली होती. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेकडून अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका लढविल्या गेल्या. पण त्यांच्या ताब्यात आलेला एकमेव कारखाना म्हणजे थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखाना. पहिल्या संचालक मंडळातील एकही व्यक्ती घ्यायची नाही, असा शरद जोशींचा दंडक होता.

पूर्वीच्या संचालक मंडळातील काही अनुभवी मंडळींना आपल्या पॅनेलमध्ये घ्यावं, त्याचा उपयोग होईल, असं त्यांच्या काही कार्यकर्त्यांचं मत होतं. यासाठी अण्णा शरद जोशींना मुंबईला भेटायला गेले. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत ऑनमनीचा मुद्दा गाजला. सरकारी धोरणातील त्रुटींमुळं कारखान्याचा बराचसा व्यवहार रोख रकमेतून (ऑन मनी) करावा लागत होता. अक्षरश: नोटा भरलेली पोतीच्या पोती कारखान्याच्या संचालक मंडळाकडं पडून असत. यातून अनेक गैरव्यवहार होत.

सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात पैसा आणि बळ दोन्हीचा वापर होतो. तो इथंही झाला, तरी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचं पॅनल निवडून आलं. महादेवअण्णा संचालक झाले. या काळात पुणे जिल्ह्यात उत्तम दर्जाच्या साखरेसाठी थेऊरचा यशवंत आणि सणसरचा छत्रपती या दोन कारखान्यांमध्ये स्पर्धा होती. थेऊरनं नेहमीच शेतकऱ्यांना उच्चांकी भाव दिला. आपल्या १५ वर्षांच्या संचालकपदाच्या काळात अण्णांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कामगार भरतीबरोबरच कामगारांचे आणि शेतकऱ्यांचेही प्रश्नं सोडविण्यासाठी प्रयत्न केले. हे करत असताना गावातील त्यावेळच्या असुविधांकडं त्यांचं दुर्लक्ष झालं नाही.

देशाचे लोकनेते शरद पवार यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या महादेवअण्णांना पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तिकीट मिळालं. दोन टर्मला अण्णा विक्रमी मतांनी जिल्हा परिषदेत विजयी झाले. सर्वसामान्यांचा नेता, दीनदलित समाजाचे प्रश्न सोडविण्याचं कौशल्य असलेली बोलण्याची लकब त्यामुळं त्यांना पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श जिल्हा परिषद सदस्य हा बहुमान मिळाला. ज्या लोकांनी आपल्याला विकासकामं करण्यासाठी निवडून दिलं, त्यासाठीच सत्तेचा वापर विकासकामासाठी करायचा हीच अण्णांची धारणा होती. २००२ ते २०१२ ही दहा वर्षं जिल्हा परिषदेत आपल्या भागाचं नेतृत्व करत असताना त्यांनी गावात प्राथमिक शाळेची इमारत उभी केली. सन २००२ पर्यंत उरुळी कांचनमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नव्हतं. ते त्यांच्या कारकिर्दीत सुरू झालं. कोविडच्या काळात त्याचा फायदा पंचक्रोशीतील सर्व गावांना झाला. लोकांना त्वरीत चाचण्या होऊन उपचार मिळू शकले. त्याचबरोबर ग्रामीण भागात सर्रास आढळणाऱ्या सर्पदंश, कुत्री चावणे, विंचू चावणे तसंच साथीच्या आजारांमध्ये याचा उपयोग झाला. आजही होतोय. याबरोबरच जनावरांसाठीही उरळी कांचनला अत्याधुनिक दवाखाना असून त्यात ऑपरेशन थिएटरसारख्या आधुनिक सुविधाही आहेत.

अण्णांच्या धर्मपत्नी प्रतिभाताई कांचन या स्वत: बीएससी ॲग्री असल्यामुळं त्यांना शेतकरी, श्रमजीवी, महिलांच्या प्रश्नांची जाणीव होती, म्हणून त्यांनी अस्मिता महिला बिगरशेती सहकारी पतसंस्था स्थापन केली. त्यामध्ये ४ हजार महिला सभासद असून संस्थेचं भागभांडवल २५ कोटी रुपये आहे. यातूनच सर्वसामान्य महिलांना अल्प दरात कर्ज देऊन एक समाजसेवेचं व्रत त्यांनी हाती घेतलेलं आहे.

मणीभाई देसाई यांच्या देहांतानंतर महात्मा गांधी सर्वोदय संघाचे अध्यक्ष शरद पवारसाहेब झाले. त्यांच्या विश्वस्त मंडळात अण्णा विश्वस्त झाले.

त्यांच्याबरोबर काम करत असताना साहेबांचाच सुरुवातीपासून असलेला विश्वास अण्णांनी या संस्थेत सार्थ ठरविला. साहेब त्यांना ‘म्हादा’ या नावाने संबोधित करायचे, एवढी साहेबांशी जवळीक अण्णांनी केली. जवळपास १० ते ११ हजार विद्यार्थी महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या संकुलात शिकत आहेत. या संस्थेचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडं आल्यावर त्यांच्या माध्यमातून या संस्थेला ३० ते ३५ कोटी रुपयांची मदत अनेक कंपन्यांकडून मिळाली. यातून सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या मुलांना उच्चशिक्षण मिळालं पाहिजे, हीच धारणा अण्णांची आहे. या संस्थेमार्फत मेडिकल कॉलेज काढावं, अशी विनंती त्यांनी पवारसाहेबांना केली होती, पण त्यावेळी ते होऊ शकलं नाही म्हणून अण्णांनी पवारसाहेबांच्या परवानगीने वैद्यकीय क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं.

उच्च शिक्षणाची सुरवात त्यांनी घरातूनच केली. त्यांनी आपला मुलगा अजिंक्य कांचन आणि मुलगी अस्मिता कांचन यांना उच्च शिक्षित केलं.

अस्मितानं रशियाला जाऊन वैद्यकीय शिक्षण म्हणजेच भारतातल्या एमबीबीएसच्या तोडीची डिग्री मिळवली. भारतात परतल्यावर तिला एक परीक्षाही द्यावी लागली. अवघे साडेतीन टक्के निकाल लागलेल्या या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तिच्या पदवीला एमबीबीएस दर्जाची मान्यता मिळाली. नंतर तिनं एमडी रेडिओलॉजिस्ट पूर्ण केलं. आता डॉ. अस्मिता उरुळीकांचन आणि पंचक्रोशीत तसंच लग्नानंतर पुण्यामध्ये गोरगरीब रुग्णांची सेवा करीत आहेत. आपल्या वडिलांचा समाजसेवेचा वसा अविरतपणे सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. मुलगा अजिंक्य कांचन यांनी एमबीए करून ह्युमन रिसर्चमध्ये पीएचडी केली आहे. आपल्या वडिलांचा शेतीव्यवसाय, नर्सरी व्यवसाय, दुग्धव्यवसाय त्याचबरोबर समाजकारण,

राजकारण, धार्मिक व आध्यात्मिक या सर्व क्षेत्रांत अजिंक्य कांचन आजी,आजोबा आणि आई-वडिलांचा वारसा चालवत आहेत. समाजातील इतर मुलांनाही उत्तम शिक्षण मिळावं, अशी अण्णांची इच्छा होती. अशातच अण्णांनी २०१८ मध्ये अजिंक्य चॅरिटेबल फौंडेशन या संस्थेची स्थापना केली. महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मसी हे महाविद्यालय सुरू करून यामध्ये बी. फार्मसी आणि डी. फार्मसी हे कॉलेज सुरू केले. शासनाच्या नियमाप्रमाणे ६०० विद्यार्थी संख्या असलेलं हे कॉलेज अल्पावधीत नावारुपाला आलं. उत्तम स्टाफ व उत्तम प्रशासन याच्या जोरावर महाराष्ट्रातील अग्रगण्य फार्मसी कॉलेजच्या यादीत अण्णांच्या कॉलेजचा समावेश झाला. या कॉलेजने अनेक विद्यार्थ्यांना सिरम, सिप्ला अशा अनेक वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या. त्याचबरोबर अण्णांनी सिद्धीविनायक क्रिटीकेअर मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालय १०० बेड व वासुदेव वाघाडे मेमोरियल रुग्णालय ५० बेड, पीएमके डायग्नोस्टिक सेंटर अशा सर्व वैद्यकीय

क्षेत्रातील सुविधा सर्वसामान्य लोकांना देण्यास अण्णांनी सुरुवात केली. या समाजानं आपल्याला मोठं केलं, त्या समाजाची उतराई कऱण्याचं काम डॉ. अस्मिता आणि डॉ. अजिंक्य कांचन अण्णांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. त्याचबरोबर डॉ. अस्मिता प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरू करून जवळपास हजार विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेत आहेत. तसेच डॉ. अस्मिता इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम सीबीएससी स्कुल सुरू केलं. या शाळेत पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे अकरावी व बारावी फक्त विज्ञान शाखा सुरू करून या विभागात जवळपास ९८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वात जास्त विद्यार्थी असलेली विज्ञान शाखा म्हणून या

कॉलेजकडं पाहिलं जातं. या सर्व संस्थांचं कामकाज अण्णांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अस्मिता कांचन- बहिरट, संस्थेचे सचिव डॉ. अजिंक्य कांचन, संचालिका ऋतुजा अजिंक्य कांचन, संस्थेचे संचालक डॉ. आप्पासाहेब जगदाळे हे समर्थपणे पेलत आहेत.


समाजातील दीनदलित, गोरगरीब, अठरापगड, बाराबलुती लोकांच्या मुलामुलींना शिक्षण क्षेत्रातील दालने माफक फीमध्ये उपलब्ध करून समाजाच्या ऋणातून उतराई करण्याचा अण्णांचे मानस आहे. शिक्षणाची फक्त डिग्री नको, तर त्याच्या आय़ुष्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्याला उत्तम नोकरी मिळाली पाहिजे, म्हणून अनेक नामवंत कंपन्यांशी ही संस्था संलग्न आहे.

भविष्यामध्ये डिग्री आणि डिप्लोमाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, त्याचबरोबर नर्सिंग कॉलेज, बीएचएमएस, एमबीबीएस कॉलेज सुरू करण्याचं नियोजन आहे.

शेतकऱ्याच्या मुलाला आजच्या काळात व्यावसायिक शिक्षण गरजेचं आहे. ‘शेती मरू देत नाही पण व्यवस्थित जगूही देत नाही’, त्यामुळं मुलं शिकली तरच शेतकरी कुटुंबांचा आणि गावाचाही खऱ्या अर्थानं विकास होईल, असं त्यांना वाटतं. आर्थिक दृष्ट्या कमकुवत मुलांच्या शिक्षणासाठी ते सर्वतोपरी मदत करत असतात. महादेवअण्णा म्हणजे सर्वसामान्य गरीब माणसाचा हक्काचा माणूस! भाषा मवाळ असली तरी वेळप्रसंगी ती जहाल झालेली असते. कारखाना असो, जिल्हा परिषद असो किंवा इतर कोणतीही निवडणूक, अण्णांची ग्रामीण लहेजातली भाषणं लोकांना खिळवून ठेवतात. राजकारणापायी त्यांना अनेक गुंड प्रवृत्तींचाही सामना करावा लागला आहे. अशा वेळेस ते सडेतोड आणि लढवय्ये असतात.

त्यांच्या या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्यामध्ये यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कै. दत्तोबाअण्णा कांचन, उरुळीकांचन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व मा. सरपंच ज्ञानदेव तुळशीराम कांचन उर्फ माऊलीनाना तसेच अखिल भारतीय द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष व महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सचिव सोपानराव कांचन यांचे आशीर्वाद आणि सहकार्य अण्णांना मिळाले. या प्रवासात पत्नी प्रतिभाताई कांचन यांची मोलाची साथ अण्णांना मिळाली. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक मुलगा ते उरुळीकांचन व पंचक्रोशीतील शिक्षणमहर्षी हा अण्णांचा प्रवास हा नक्कीच सर्वसामान्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

आपल्या लहानपणीच्या परिस्थितीकडं नकारात्मकतेनं न पाहता त्यांनी यशाचं एकएक पाऊल टाकलं. ते पाऊल त्यांच्याबरोबरच उरुळी कांचनलाही देदिप्यमान करत आहे- सोन्यासारखी झळाळी देत आहे.

COMMENTS

error: Content is protected !!