कुक्कुटपालनात आशेचा ‘किरण’ : नबाजी काळभोर

काळाची पावलं ओळखून जो आपला व्यवसाय निवडतो, तो हाडाचा उद्योजक. लोणी काळभोर येथील नबाजी काळभोर यांनी पोल्ट्री (कुक्कुटपालन) या व्यवसायात संधी शोधली आणि हळूहळू आपला व्यवसाय वाढवत नेत ‘किरण पोल्ट्री ॲन्ड ब्रिडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड’ ही कॉर्पोरेट कंपनी उभी केलीय.

शेतिपूरक व्यवसाय ही काळाची गरज आहे. केवळ शेती करून कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागत नाहीत. अत्यंत जोखमीचा असला तरी सध्या कुक्कुटपालन हा भारतातील शेती क्षेत्रातील सर्वांत वेगाने वाढणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. नबाजी काळभोर यांनी हा व्यवसाय निवडला आणि आपल्या कार्यकर्तृत्वाची चमक दाखवून मराठी तरुण उद्योजकांना उद्योग-व्यवसायाची आशादायक स्वप्नं दाखवली आणि ती पूर्ण करण्यास मदतही केली.

महाराष्ट्रातल्या सजग शेतकऱ्यांच्या यादीत नबाजी यांचा क्रमांक खूप वरचा लागतो. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या नबाजी यांचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं. नबाजींसह आई-वडील, मोठी बहीण, छोटा भाऊ असं त्यांचं पंचकोनी कुटुंब. त्यांची शाळा घरापासून पाच किलोमीटर अंतरावर होती. ते शाळेत चालत जात असत. घरची आठ ते दहा एकर इतकी शेती असली तरी शेतमालातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नामुळं घरचे खर्च कसेबसे भागत असत. हा अनुभव नबाजी यांना लहानपणापासूनच येत असे.

त्यामुळं केवळ शेतीव्यतिरिक्त वेगळं ज्ञानही घ्यायला हवं, हा विचार करून त्यांनी आठवीला टेक्निकल विषय घेतला. दहावीनंतर औंधमधील आयटीआयमध्ये सिव्हिल ड्राफ्ट्समन हा तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केला. दोन वर्षं शिक्षण आणि एक वर्ष प्रॅक्टीस असं त्या कोर्सचं स्वरूप होतं. त्यानंतर त्यांना नोकरी मिळाली.

नोकरीच्या निमित्तानं त्यांनी आपलं गाव सोडलं. नियमित मिळणाऱ्या वेतनातून त्यांना स्थैर्यही मिळालं. त्यावेळी त्यांची मोठी बहीण आणि दाजी भोर तालुक्यात राहत होते. नबाजींनी तिच्या घरी गेल्यावर त्यांचं पोल्ट्रीचं युनिट पाहिलं.

नबाजींचे दाजी शेतीला जोडव्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत असत. त्यांच्यामुळं ‘आपणही पोल्ट्री सुरू केली तर…’ हा विचार नबाजींच्या मनात आला. दाजींना पोल्ट्रीचा दुहेरी लाभ होत होता. त्यांनी पोल्ट्री सुरू केल्यानंतर त्यातून ब्रॉयलर चिकनचं उत्पन्न येत होतंच, तसंच शेतातील उत्पादनावरही त्याचा सकारात्मक परिणाम झाला होता. पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या विष्ठेचं सेंद्रीय खत शेतीला मिळायचं आणि त्यामुळं मातीचा पोत

सुधारून उत्पादन चांगलं येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

कुक्कुटपालन करायचं हे मनाशी नक्की केल्यावर त्यांनी इतर शेतकऱ्यांचे पोल्ट्री फार्मही पाहिले. थंडी-वाऱ्याचा, अतिउष्णतेचा पक्ष्यांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास केला. पक्ष्यांची काळजी कशी घ्यायची, याची माहिती मिळवली. त्यासंबंधी भरपूर वाचन केलं. व्यवसाय उभा करताना सुरुवातीला त्याचा आवाका किती असावा, भांडवलाची सोय कशी होऊ शकते, कर्जप्रक्रिया कशी असते, याबाबत त्यातील तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन घेतलं.

सर्वसामान्य शेतकऱ्यांकडं पुरेसं भांडवल सहसा नसतं. नबाजींचीही तशीच परिस्थिती होती. भांडवल उभं करण्यासाठी १९९३ साली त्यांनी ‘लँड डेव्हलपमेंट बँके’तून कर्ज काढलं आणि गावातील आपल्या शेतातच पोल्ट्रीसाठीची शेड उभी केली. तीन हजार पक्ष्यांपासून सुरुवात केली. आधीच कुक्कुटपालनाबद्दल बरीच माहिती मिळवली असल्यानं त्यांना फार अडचणी आल्या नाहीत. कधी आल्याच, तर त्यांनी वेळोवेळी उपाययोजना करून त्यावर मात केली. त्यामुळं या व्यवसायात त्यांना चांगलं यश मिळालं.

शेवटी सन १९९५ मध्ये त्यांनी नोकरी सोडली. पूर्णवेळ व्यवसायाकडं लक्ष द्यायला सुरुवात केली. सन २००२ पर्यंत ते ५० हजार पक्ष्यांपर्यंत पोहोचले. त्याच वर्षी कंत्राटी शेती ही नवीन संकल्पना आली. ही संकल्पना उचलून धरून त्यांनी पोल्ट्री व्यवसायाचं एका उद्योग समूहात रुपांतर करायचं ठरवलं. खरं तर व्यवसाय सुरू केल्यावर त्यांनी त्याची मर्यादा कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागतील, एवढीच ठेवायची असं ठरवलं होतं; पण चिकनला जशी मागणी येऊ लागली तसा त्यांना व्यवसाय विस्तार करावा वाटला. बदलत्या जगाकडं त्यांचं लक्ष होतंच. आपल्या कुटुंबापुरताच हा व्यवसाय मर्यादित ठेवण्यापेक्षा इतर शेतकऱ्यांनाही यामध्ये जोडून घेण्याचं त्यांनी ठरवलं.

असं ते व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांना आवर्जून सांगतात. इतर शेतमालाच्या बाजारभावांप्रमाणेच या व्यवसायातही दररोज दर बदलतात. एका पोल्ट्रीमधून जास्तीत जास्त सहा ते सात बॅच निघू शकतात. याचाच अर्थ, पंचेचाळीस दिवसांत सहा ते सात वेळेस जो भाव असेल त्या भावाने विक्री करावी लागते. हे टाळायचं असेल, तर आपल्याकडं दररोज विक्रीसाठी माल उपलब्ध असायला हवा. यातून भावातील चढउतारामुळे होणारं नुकसान आपण कमी करू शकतो.

त्या काळात पोल्ट्री व्यवसायातील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अनेक ठिकाणी सुरू झालेलं होतं. तिथं भेटी देऊन त्यासंदर्भात माहिती घेतली. त्यानंतर ज्यांनी पोल्ट्रीसाठी शेड तर उभी केली आहे, पण भांडवलाअभावी किंवा अन्य अडचणी आल्यामुळं व्यवसाय करू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांची माहिती काढून त्यांना नबाजी भेटले. त्यांना कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्मविषयी माहिती दिली आणि अशा शेतकऱ्यांच्या पोल्ट्री शेडचा उपयोग करून व्यवसाय वाढविण्याचा प्रयोग सुरू केला. त्यावेळी त्यांच्यासाठी काम करू इच्छिणाऱ्या काही शेतकऱ्यांनी त्यांना आपली आर्थिक अडचण सांगितली. त्या शेतकऱ्यांकडं कोंबड्यांची पिल्लं, त्यांचं खाद्य आणि औषधं घेण्यासाठी पैसे नव्हते. नबाजींनी त्यांना दिलासा दिला आणि त्यांच्याकडं नव्हतं, ते त्यांना उपलब्ध करून दिलं.

या व्यवसायात सहभागी असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने पंचेचाळीस दिवस पिल्लं सांभाळायची, ती निगुतीनं मोठी करायची, त्यानंतर परिपक्व झालेल्या कोंबड्या नबाजींची कंपनी घेऊन जाणार आणि त्यांची विक्री करणार, असं ठरलं. पक्ष्याच्या वजनाप्रमाणे यासाठीची रक्कम शेतकऱ्याला दिली जाईल, हेही ठरलं. आज पोल्ट्री उद्योगात अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी आपापला ब्रॅंड तयार केला आहे. नबाजी काळभोर यांची आर्थिक ताकद त्यांच्या तुलनेनं खूप कमी होती.

‘एकमेकां सहाय्य करू…’ या धर्तीवर त्यांनी ज्यांच्याशी करार केले होते, त्या शेतकऱ्यांना विश्वास दिला. लवकरच त्यांचीही या व्यवसायातून चांगली मिळकत होऊ लागली. त्यातून आणखी शेतकरी मिळत गेले. असं एक मोठं सांघिक काम उभं राहिलं. आपल्याला जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांना कामाची पद्धत समजावून सांगणं, वेळेचं महत्त्व पटवून देणं, हे प्राधान्यानं करावं लागलं. कारण या व्यवसायात वेळेचं नियोजन फार महत्वाचं असतं. पंचेचाळीस दिवसांच्या या जीवनचक्रात खाद्य, पाणी आणि औषधं योग्य वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत. यानंतर तयार झालेल्या ब्रॉयलर कोंबड्या वेळेवर ‘किरण पोल्ट्री फार्म’मध्ये दिल्या पाहिजेत.

वेळेचं गणित चुकलं, तर नुकसानीला सुरुवात होते. तसं होऊ नये म्हणूनच एक काटेकोर यंत्रणा त्यांनी उभी केली.

नबाजींच्या पोल्ट्रीमध्ये या सगळ्यातील महत्वाची गोष्ट जी होती, ती म्हणजे पिल्लं तयार करणं. अंडी उबवणं आणि त्यातून पिल्लं बाहेर येण्यापर्यंतची जोखमीची प्रक्रिया काळभोर यांची कंपनी पार पाडते. एक दिवसाची ही पिल्लं त्यांनी जोडलेल्या शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्मवर पाठवली जातात. कंपनी स्वत: खाद्य तयार करते.

शेतकऱ्यांपर्यंत औषधं आणि खाद्य वेळेत पोहोचवण्याचं काम केलं जातं. शेतकऱ्यांना याबाबत सर्वतोपरी मार्गदर्शन केलं जातं.


काही आकस्मित अडचण आली, तर कंपनीकडून वैद्यकीय मदतही पुरवली जाते. ब्रॉयलर कुक्कुटपालनाचा एवढा मोठा व्यापक उद्योग उभा राहिला, कष्ट, वेळेचं गणित काटेकोर पाळणं, कुक्कुटपालन व्यवसायातील घडामोडींविषयी अपडेट राहणं, पारदर्शी व्यवहार यामुळं विश्वासार्हता वाढली. कोंबड्यांना मागणीही वाढली. हे सगळं करत असताना मोठी संकटंही आली. त्यात प्रामुख्याने २००६ सालचा बर्ड फ्लु आणि २०२० मधील कोविडचा उल्लेख करावा लागेल. या काळात हा व्यवसाय अक्षरश: डबघाईला आला होता; पण त्यामुळं खचून जातील तर ते नबाजी कसले? त्यांनी शून्यातून पुन्हा सुरुवात केली. त्यांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे या संकटांवरही मात केली.

कोविडच्या काळात तर केवळ पसरलेल्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसायाचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. या दोन्ही वेळेस व्यवसायाला प्रचंड हादरा बसला. या व्यवसायाची एक सायकल असते. त्याला खीळ बसली, तर पुन्हा उभं राहण्यासाठी अनेक महिने जावे लागतात. मोठ्या संयमाने त्यांनी या दोन्ही वेळेला आपल्या व्यवसायाला पुन्हा उभं केलं. सन १९९३ – ९४ मध्ये व्यवसाय सुरू केल्यावर त्यांचा २५ लाख रुपये इतका टर्न ओव्हर होता. कोविडच्या आधीपर्यंत तो वधारून १५५ कोटी रुपयांपर्यंत आला होता, पण नंतर त्याला खीळ बसली आणि तो घसरला. आता मात्र त्यांनी तो १५० ते १६० कोटींवर टर्न ओव्हर आणण्यात यश मिळवलं आहे.

आगामी दोन वर्षांत अडीचशे ते तीनशे कोटींच्या आसपास टर्न ओव्हर जाईल, अशी त्यांची खात्री आहे. कोविडच्या काळातील अनुभव ते सांगतात,

या अनुभवांतून नबाजी खूप शिकले. व्यावसायिक म्हणून काम करताना अनेक सरकारी यंत्रणांशी संबंध येतो. देश आणि राज्य पातळीवरील पोल्ट्री व्यावसायिकांच्या संघटना आहेत. या संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत. या माध्यमातूनही या व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न केला जातो. याहीपुढं जाऊन आता ते नवीन भरारी घेण्यास सज्ज आहेत. त्यांचा मुलगा हर्षद पदवीचं शिक्षण घेतो आहे. मात्र, आतापासूनच त्यानं वडिलांच्या व्यवसायात रस घेण्यास सुरुवात केली आहे. आपल्याकडं पोल्ट्री मोठ्या प्रमाणात आहेत, पण अजून निर्यात नगण्य आहे. म्हणूनच भविष्यकाळात प्रक्रिया आणि निर्यातीच्या दिशेनं जाण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

हर्षदनं आता यासाठीचा अभ्यास सुरु केलेला आहे. काही काळातच तो नबाजींच्या मदतीला येईल. त्यानंतर त्यांचा हा व्यवसाय अनेक पटींनी वाढविण्यासाठी मदत करू शकेल. मराठी शेतकऱ्यांच्या मुलांनी पारंपरिक शेती न करता किंवा कुणाच्या हाताखाली नोकरी न करता शेतीला पूरक काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. प्रामाणिकपणानं व्यवसायात उतरलं पाहिजे. असं ते सांगतात. हे बोल त्यांच्या अनुभवाचे आहेत.

हे बेंजामीन फ्रॅंकलिन यांचं वाक्य नबाजी काळभोर यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं. ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसायाच्या बाजारपेठेत महाराष्ट्राचं वर्चस्व आहे. सन २०२३ मध्ये भारतातील पोल्ट्री बाजारातील उलाढाल अंदाजे २,०९९.२ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचली. भविष्याचा विचार करता, २०२४ ते २०३२ या कालावधीत ती वधारुन ४,६२०.६ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. देशभरातील वाढती लोकसंख्या, पोल्ट्री उत्पादनांची वाढती मागणी, ग्राहकांच्या आहारातील प्राधान्य यामुळं नबाजींच्या दूरदृष्टीला दाद द्यावी वाटते. ते सांगतात, ‘पोल्ट्री हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक उत्तम साधन असेल.’

COMMENTS

error: Content is protected !!