जेआरडी टाटा या उद्योगपतींचा, ‘दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याचं स्वप्न पाहा, चांगले उद्योजक नक्की व्हाल’ हा आदर्श तंतोतंत पाळणाऱ्या उरूळी कांचन जवळच्या भवरापूर येथील सुभाष साठे यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव तसंच मान आणि धनही मिळवून देण्यासाठी फ्रोजन स्वीट कॉर्न मका निर्मिती करून ‘प्रिन्स’ या ब्रँडनं तिची विक्री सुरू केली, त्याची कहाणी.
‘तुमच्याकडे संधी येण्याची वाट पाहू नका, स्वतःच्या संधी निर्माण करा.’, हे जेआरडी टाटांचं तत्त्वज्ञान उद्योजक सुभाष साठे स्वतः आचरणात आणतात. त्यांची एस. एस. ॲग्रो फुड्स ही कंपनी उरुळी कांचनजवळ भवरापूर येथे आहे.
आपल्या कंपनीच्या माध्यमातून ते गोठवलेला (फ्रोजन) मका तयार करून देशात आणि परदेशात पाठवतात. त्यांच्या या व्यवसायानं मका उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा हात दिला आहे. एखादा व्यवसाय उभा करताना व्यावसायिक स्वतःबरोबरच अनेकांची उन्नती घडवून आणत असतो. सुभाष साठे यांचं याबाबत बोलकं उदाहरण आहे. सुभाषसरांचा जन्म भवरापूरमध्ये शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलोपार्जित तेरा एकर जमिनीत त्यांचे वडील ऊस, टोमॅटो, भेंडीसारखी पिकं घेत. त्यांचे वडील हा शेतीमाल विक्रीसाठी उरुळी कांचनला पहाटेच्या बाजारात घेऊन जात. त्यावेळी साठे सर बारा-तेरा वर्षांचे असताना ते वडिलांच्या बरोबर जात. वडील ज्यावेळी बाजारात भाजीपाला घेऊन जायचे, त्यावेळी तेथील व्यापारी शेतकऱ्याशी खूप उद्धटपणाने वागायचे. शेतकरी दिवसभर शेतातून माल काढायचा, रात्री तो निवडून

आई-वडील व पत्नीसह सुभाष साठे
ठेवायचा आणि विश्रांती न घेता बाजारात जायचा, मात्र खरे कष्ट करून त्याला तिथं काडीची किंमत नसायची. कवडी मोलानं व्यापारी भाजीपाला शेतकऱ्याकडून घ्यायचा आणि शेतकऱ्याला हमाल समजून तो माल आपल्या गाडीत टाकायला लावायचा. हे सर्व पाहून साठे सरांना खूप दुःख व्हायचं. त्यांच्या वडिलांना सुद्धा इतर शेतकऱ्यांसारखीच वागणूक मिळायची.
शेतकरी असणं काय गुन्हा आहे का, असा प्रश्न नेहमी त्यांना पडायचा. जगाच्या पोशिंद्याची हेळसांड पाहून खूप राग यायचा, पण काहीच इलाज नसायचा. तिथं होणारी हेळसांड त्यांच्या जिव्हारी लागायची. साठे सरांचे आजोबा गावाकडं गावगाडा बघायचे. त्यांच्या नंतर वडीलसुद्धा गावातील कुठलंही पद नसताना इतर सहकाऱ्यांसह गावगाडा पाहत असत. गावातील अनेक गोष्टींचा निपटारा ते करत असत. वडिलांना गावात खूप मान असायचा, पण गावातील माणसांची आणि बाजारातील व्यापाऱ्यांची वागणूक यात खूप तफावत असायची. शेतकऱ्याला त्याच्या गावात किती मान असला तरी ज्यावेळेस तो बाजारात जातो त्यावेळेस त्याला कुठलीच किंमत राहत नाही. बाजारामध्ये आडते आणि व्यापारी त्याच्या मालासकट त्याचीही कवडी मोलाची किंमत करतात याचं दुःख मुलाच्या मनात सतत जाचत राहिलं. दहावीनंतर त्यांनी आयटीआयचं शिक्षण घेतलं आणि कुठं तरी नोकरी केली पाहिजे, या उद्देशानं जवळच असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन के.डी. कांचन यांच्याकडं वडील त्यांना घेऊन गेले. कांचन यांनी त्यांना लगेचच कारखान्यात नोकरी दिली. तिथं दहा-बारा वर्षं नोकरी करत असताना गावच्या राजकारणातही त्यांनी थोडंसं लक्ष घातलं. पहिल्याच निवडणुकीत ते सरपंच झाले. स्वतःची शेती, गावगाडा आणि नोकरी अशी तिन्ही कामं चालू होती.
त्याचवेळी ‘अॅग्रोवन महासरपंच परिषद’ म्हणून सकाळ माध्यम समुहानं एक संधी निर्माण केली होती. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून दोन असे सरपंच निवडायचे आणि कुठल्या तरी जिल्ह्यात महापरिषद भरवायची. त्या परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून छोटे-मोठे उद्योजक, काही कंपन्या, तज्ज्ञ लोक जातात आणि तिथं खूप चांगली माहिती मिळते.

त्या महापरिषदेसाठी तालुक्यातून जाण्याची संधी साठेसरांना मिळाली. या परिषदेला विदर्भ, मराठवाडा येथूनसुद्धा काही तरुण उद्योजक आले होते. मराठवाड्यात चार-चार महिने दुष्काळ असतो. व्यवसायासाठी संधी खूप कमी असतात. अशा ठिकाणचे उद्योजक भेटले आणि मनात प्रश्न उभा राहिला की, अशा भागातील उद्योजक तरुण व्यवसाय यशस्वी करून दाखवतात; मग आपण तर पुणे शहराजवळ आहोत, जमीन आहे, बारा महिने पाणी आहे, आपण तर नक्कीच उद्योगात यशस्वी होऊ शकतो. त्याचवेळी त्यांनी ठरवलं की, राजकारणातून बाहेर पडायचं आणि व्यवसाय सुरू करायचा. मात्र, व्यवसाय असा करायचा की, तो शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल. भाव पडलेले असतानासुद्धा त्यांचा माल आपल्याला घेता आला पाहिजे. सरपंच परिषदेहून परतल्यानंतर दोन दिवसांनी व्यवसायविषयक अभ्यास त्यांनी सुरू केला आणि त्यांच्या लक्षात आलं की, काही पिकांवर प्रक्रिया करून तो माल आपण साठवू शकतो. त्याची विक्री करू शकतो. वेगवेगळ्या युनिटला भेटी देत असताना कोल्ड स्टोअरेज ऑपरेटर अक्षय आमले यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांनी अनेक वर्षं कंपनीमध्ये काम केलेलं असल्यामुळं खूप महत्त्वाची माहिती मिळाली. शेतमालावर प्रक्रिया करणारे प्लांट उभे करून देणारे अविनाश वामन यांची भेट त्यांनी घालून दिली. त्यांच्याशी सखोल चर्चा झाल्यावर मधुमक्यावर (स्वीट कॉर्न) प्रक्रिया करायचं युनिट व कोल्ड स्टोअरेज उभं करायचं पक्कं झालं. पिकाची निवड करताना ते बारमाही पिकणारं असावं, असं पीक म्हणजे मका आणि ऊस. त्यांनी स्वीट कॉर्न (मधुमका) याची निवड केली. अलिकडं शहरांमध्ये स्वीट कॉर्नला जास्त मागणी असते. गरजेप्रमाणे पुरवठा यानुसार मधुमका हे पीक निवडलं. या पिकामुळं बाराही महिने शेतकरी आणि कामगार वर्ग यांना अर्थार्जनाची संधी उपलब्ध होणार होती.
प्लांट उभा करायचा ठरवलं, पण त्याला पैसा कुठून आणि कसा उभा करायचा, याचा प्रश्न उभा राहिला. उरुळी कांचनमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत गेल्यानंतर येथील अधिकाऱ्यांनी शेती एन. ए. (नॉन ॲग्रीकल्चर) करून मॉर्गेज म्हणजेच गहाण ठेवली, तर बँक तुम्हाला कर्ज देईल, अशी हमी दिली. चार-पाच महिन्यांच्या कालावधीत शेतातील एक एकर जमीन एन. ए. करून बँकेकडं मॉर्गेज केली. त्यानंतर बँकेनं त्यांना कर्ज देण्यासाठी मान्यता दिली. प्लॅन्ट उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. या कामी त्यांचे मित्र संजय भोसले यांची खूपच मदत झाली. अनेक अडचणींना तोंड देत आठ ते दहा महिन्यांच्या कालावधीत प्लांट उभा राहिला. प्लांटसाठी कामगार वेगवेगळ्या स्वरूपाचा लागतो. मक्याचे दाणे सोलणारे कामगार मिळणं थोडं कठीण असतं. त्यानंतर मायनस तापमानामध्ये काम करणारे कामगार मिळणं फारच जिकिरीचं असतं. मक्याचे दाणे हातानंच काढावे लागतात, त्याचंही एक तंत्र असतं. मका निवडण्याचं काम महिला वर्ग उत्तम पद्धतीनं करत असल्यामुळं परिसरातल्या महिलांनाही रोजगार मिळाला. एका महिलेला स्वीट कॉर्नचे शंभरहून अधिक किलो दाणे काढावे लागतात, तरच ते परवडतं. सुरुवातीला काही कुशल महिलांबरोबरच शिकाऊ महिलांनाही या कामासाठी निवडलं. नंतर त्याही या कामात तयार झाल्या. इतर कामांसाठीही वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर नेमण्यात आले व त्यांच्यामार्फत काम सुरू केलं. आज पंचवीस टनांचा कंटेनर साठेसरांकडं दररोज तयार होतो, तोच कंटेनर तयार करायला त्यांना त्यावेळी १० ते १२ दिवस लागायचे. अशा प्रकारे त्यांचं काम हळूहळू सुरू झालं.

मक्याचं पीक तीन महिन्यांत निघतं. त्यादरम्यान साठेसरांच्या ऑफिसमधले फिल्ड ऑफिसर शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देतात. कणीस काढणीला आल्यानंतर त्यांना त्याची काढणी कधी करायची, ती तारीख सांगतात. त्या ठराविक दिवशी कणीस कारखान्यात आणलं जातं आणि दाणे वेगळे काढून मक्याचा पाला गुरांसाठी दिला जातो. कारण मक्याचा पाला हा गुरांसाठी उत्तम आहार समजला जातो. शेतकऱ्याला वर्षभरात मक्यासह वेगवेगळी पिकंही घेता येतात.
गोठवलेल्या मधुमक्याच्या युनिटसाठी स्वत:च्या शेतातील मधुमका पुरेसा पडणार नसल्यानं इतर शेतकऱ्यांकडून मका घेणं आवश्यक होतं.
हे शेतकरी कसे जोडले? असं विचारल्यावर ते सांगतात,
माझे अनेक शेतकऱ्यांशी चांगले संबंध आहेत. खेड, शिरुर, दौंड तालुक्यांतल्या शेतकऱ्यांनी मला मका द्यायला सुरुवात केली. मी काही वर्षांपूर्वी कृषिमित्र म्हणूनही काम केलंय. त्यामुळं मकाउत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना या प्रकल्पाविषयी सांगितलं. सुरुवातीला बियाणंही आम्हीच पुरवलं. गोठवलेल्या मधुमक्यासाठी पीक कसं घ्यायचं, त्याचं तंत्र त्यांना बांधावर जाऊन शिकवलं. त्यांना वेळच्यावेळी मार्गदर्शन केलं. ज्या शेतकऱ्यांकडं बियाणं घ्यायला पैसे नव्हते, त्यांना ते उधार दिलं आणि पीक आल्यानंतर सगळा व्यवहार केला. मका ज्या दिवशी युनिटमध्ये येतो, त्यानंतर दोनच दिवसांत त्यांना पेमेंट केलं जातं. इतक्या लवकर शेतमालाचे पैसे मिळाल्यानं त्यांनाही आनंद होतो. केलेल्या कष्टांचं चीज होतं.’’ भाजीपाला, फुलं अशा शेतमालाला कोणतंही मार्केट उपलब्ध असतं, तसं मक्याचं नाही. बरेचदा नैसर्गिक आपत्ती किंवा वातावरणामुळे आपल्या भागातील मका जर खराब झाला तर अशा वेळी ऑनलाईन कंपन्या शोधाव्या लागतात. वेगवेगळ्या राज्यांतून आणि जिल्ह्यातून मका आणून ऑर्डर वेळेवरच पूर्ण करावी लागते.
मक्याचे दाणे प्रक्रियेदरम्यान मायनस बावीस डिग्री तापमानावर ठेवावे लागतात, ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत. कोणताही व्यवसाय सुरू केल्यावर बाजारपेठ शोधावी लागते. ते सांगतात,
‘‘सुरुवातीला आमचा पहिला कंटेनर मोहन जगताप यांनी त्यांच्या कंपनीमार्फत खरेदी केला. त्याचं रोख पेमेंट आम्हाला कंटेनर कंपनीबाहेर निघायच्या आतच दिलं.

मार्केटिंगसाठी रशियन कंपन्यांबरोबर भेट घेताना गौरव साठे (पहिले)
तो आनंद आमच्यासाठी खूप मोठा होता. कारण एका शेतकऱ्याच्या मुलानं विकलेल्या त्या मालाची किंमत साडेसात लाख रुपये होती. ती आम्ही पहिल्यांदाच पाहिली होती. त्यामुळं तो क्षण आमच्यासाठी फार फार आनंदाचा होता.’’
कंपनीत अशा प्रकारे माल तयार होत होता आणि भारतातील वेगवेगळ्या कंपन्या तो माल घेऊन जात. यामध्ये देशात-परदेशात वेगवेगळ्या ब्रँडअंतर्गत या मालाची विक्री करणाऱ्या कंपन्याही साठे यांच्याकडून माल घेत होत्या. त्याचवेळी त्यांचा मुलगा गौरव कॉलेजमध्ये शिकत होता आणि कंपनीतही लक्ष देत होता. त्यावेळी त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की, आपल्याकडं चांगला माल तयार होतोय, आपल्याकडून इतर कंपन्या तो माल घेऊन त्याची निर्यात करताहेत, मग आपणच आपल्या मालाची निर्यात का करू शकत नाही? ही खंत त्यानं आपल्या वडिलांजवळ व्यक्त केली.
त्यानंतर त्यानं खूप मेहनतीनं एक्सपोर्टसाठी लागणारे सर्व लायसन्स काढून घेतले. त्यासाठी आधी स्वत:चा ‘प्रिन्स’ हा ब्रँडनेम तयार केला. इतर कंपन्यांच्या ब्रँडनेमअंतर्गत साठेसरांचा जो मधुमका विकला जायचा, आता तोच स्वत:च्या ब्रँडनेमअंतर्गत विक्रीसाठी सज्ज होता. लायसेन्स काढल्यानंतर ग्राहक मिळवण्यासाठी परदेशातील अनेक कंपन्यांना हजारो मेल केले. कंपनीबाबत माहिती पाठवली.

तेव्हा कुठं तरी एक ग्राहक तयार झाला; सौदी अरेबियामधली ती कंपनी होती. त्या कंपनीनं साठेसरांकडून सॅम्पल बेसवर एक कंटेनर मागवला. त्यासाठी त्याचे पाऊच तयार करणं, बॉक्स बनवणं, मालाच्या लॅब टेस्ट करणं, हे फार किचकट काम गौरवनं करून घेतलं. पहिला कंटेनर गौरवनं वयाच्या एकविसाव्या वर्षी निर्यात केला आणि तो यशस्वीही झाला. याचा त्यांना खूप आनंद झाला.
त्यांचा माल पसंत पडल्यानंतर त्या कंपनीचे मॅनेजर साठे यांच्याकडं आले. त्यांनी पूर्ण कंपनी पाहून घेतली. त्याचा दर्जा तपासला. कंपनीची क्षमता चाचणी करून त्यांनी साठेसरांना पुन्हा ऑर्डर द्यायला सुरुवात केली. आज रोजी प्रत्येक महिन्याला ती कंपनी कमीत कमी 200 ते 250 टनांची ऑर्डर देते. अशा अनेक देशांत गौरवनं व्हिजिट केल्या आणि वेगवेगळ्या देशांतील ग्राहक त्यानं मिळवले. सौदी अरेबिया, दुबई, रशिया, कॅनडा, स्पेन, इजिप्त अशा वेगवेगळ्या देशांत गौरव माल विकतो. गौरवनं मार्केटिंगची पूर्ण जबाबदारी घेतल्यामुळं त्याला कंपनीत वेळ कमी मिळतो, म्हणून दुसरा मुलगा तेजसही आता कंपनीच्या वेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळतो. तो आर्किटेक्ट आहे. कंपनीचा व्याप वाढत गेला तसं त्याचं सुरू असलेलं ऑफिस त्याला बंद करायला लावलं आणि तोही कंपनीतील अकाउंटिंग आणि डेव्हलपमेंटचं काम पाहू लागला. तेजसनं सुरुवातीलाच कोल्ड स्टोअरेज उभं करण्यासाठी मदत केली होती. कोल्ड स्टोअरेजमध्ये अखंडित वीजपुरवठा असावा लागतो. विशिष्ट तापमान कायम ठेवावं लागतं. हे सगळं तो जबाबदारीनं पाहतो. महत्त्वाच्या ठिकाणी सर्व घरातीलच लोक असल्यामुळं त्याचा फायदा होऊ लागला.
ते सांगतात, ‘‘कोणताही शेतमाल किंवा प्रक्रिया केलेला माल परदेशात निर्यात करायचा असेल तर किमान चाळीस चाचण्यांमधून जावं लागतं. माल तिकडं पोहचण्यास पंधरा दिवस लागतात. तिथं गेल्यावरही त्याची चाचणी होते आणि मगच तो विक्रीसाठी ठेवला जातो. त्यामुळं पॅकिंग, ग्रेडिंगला खूप महत्त्व असतं.’’
आता त्यांच्याकडं दरमहा अंदाजे ५०० टन गोठवलेला (फ्रोजन) मधुमका तयार होतो. त्यातला ४०० पेक्षा अधिक टन निर्यात केला जातो. त्यांचा उद्योग भरभराटीस आलाच; पण इतर मकाउत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा देऊन जातो आहे. शेतकऱ्यांना हा प्रकल्प आपला वाटला पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे, हे एस. एस. ॲग्रो फुड्सचं ब्रीदवाक्यच आहे.ज्याच्या पायावर ही कंपनी उभी आहे, त्या शेतकऱ्यांना वेळच्या वेळी त्यांचे पैसे मिळतील याची काळजीही घेतली जाते. त्यांना चहा-पाणी विचारलं जातं. त्यांच्या समस्यांची जातीने दखल घेतली जाते. त्यांनी एक हृद्य अनुभव सांगितला. एका शेतकऱ्याच्या डोक्यावर दोन लाख रुपयांचं कर्ज झालं होतं. त्यानं या प्रकल्पाबाबत माहिती घेतली. आपला मधुमका (स्वीटकॉर्न) इथं द्यायला सुरुवात केली. पहिल्याच वेळेला त्याला दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळाली. त्या शेतकऱ्याने तातडीने दोन लाखांची रक्कम संबंधित संस्थेत वळती करण्यास सांगितलं.
त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूनच सुभाषजींना आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं. तो शेतकरी कर्जमुक्त झाला होता. नियमानुसार शेतकऱ्यांना शेतमाल देताना प्रथम नोंदणी करावी लागते. आता त्यांना नियमित मका देणारे शेतकरी स्वत:बरोबर इतर शेतकऱ्यांचाही माल घेऊन येतात.

परदेशी कंपनीबरोबर करार करताना तेजस साठे (उजवीकडून पहिले)
एकापरीने तेच आता या कारखान्याचे ब्रॅंड अॅम्बेसेडर झालेले आहेत. शेतकरी मक्याची कणसं आणतात, तेव्हा जनावरांसाठी त्यांना चाराही मिळतो. त्यामुळं दुग्धव्यवसायासाठी मका उत्पादक शेतकऱ्यांनी चार-पाच गायी घेतल्या आहेत. मक्याचा पाला आयताच मिळत असल्यानं त्यांना आपल्या शेतजमिनीत गायींच्या चाऱ्यासाठी वेगळं काही पिकवावं लागत नाही. मक्याचं सरासरी ५ टन उत्पादन एका एकरात होतं, परंतु काही शेतकरी अगदी ८ टन पर्यंतही उत्पन्न काढतात. अशा शेतकऱ्यांचा सन्मान एस. एस. ॲग़्रो फुड्स या कंपनीकडून केला जातो. त्यातून त्यांना प्रोत्साहनही मिळतं.
पहाटे साठेसरांचा दिनक्रम सुरू होतो. ते स्वत:च्या शेताला- गायींच्या गोठ्याला भेट देतात. रोज सकाळी दहा वाजता त्यांची आणि त्यांच्या दोन मुलांची मीटिंग होते. त्यात दिवसभराचं कामकाज ठरतं. काही समस्या असतील, तर त्यावर तोडगा काढला जातो. साठेसरांच्या युनिटसाठी आता सुमारे दोनशे लोक काम करतात. पहिल्याच वर्षी ४ कोटी रुपयांची झालेली उलाढाल आता २५ ते ३० कोटींवर जाऊन पोचली आहे.
साठेसरांना विचारण्यात आलं की, ‘भविष्यात तुमची काय स्वप्नं आहेत, तुमच्या या कारखान्याचा किती टर्नओव्हर व्हावा, असं तुम्हाला वाटतं’, त्यावेळी त्यांनी खूपच मार्मिक उत्तर दिलं. ते असं की, ‘‘कंपनीचा टर्नओव्हर किती असावा, याचा विचार आम्ही कधीच केला नाही. आमचं खरं ध्येय एकच आहे की, शेतकऱ्याचा वर्षभरात अडीच ते कारण आपण एकटं मोठं होण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांच्या, ज्या कामगारांच्या सहकार्यानं कंपनी वाढत आहे, त्या सगळ्यांना घेऊन मोठे होऊ शकतो, असा सल्ला मी माझी मुलं तेजस आणि गौरव यांना देतो.’’

मक्याबरोबरच मिक्स व्हेज, फ्रोजन मटार, आंब्याचे स्लाईस यांसारख्या इतर पदार्थांना गोठवून त्यांचीही विक्री केली जाते. मधुमक्याचे पॅकेट आता ज्यांच्याकडे फ्रिजर असेल अशा कुठल्याही दुकानात विक्रीसाठी ठेवता येतात. त्यामुळं छोटे दुकानदारही ते आपल्याकडं विक्रीस ठेवू शकतात. २०१६ साली सुरू झालेल्या या व्यवसायानं तरुण शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. सततच्या प्रयत्नांमुळे देशातील सर्वोत्तम गोठवलेल्या मधुमका उत्पादकांपैकी एक होण्याचा मान या कंपनीनं मिळवला आहे. म्हणूनच हा स्वीट कॉर्न मक्याच्या दुनियेतला खराखुरा ‘प्रिन्स’ आहे.
COMMENTS